रोजगार निर्मितीमध्ये हिंदी भाषेचे योगदान महत्त्वाचे – डॉ. सदानंद भोसले
अहमदपूर (गोविंद काळे) : ‘हिंदी’ ही भारतातील सर्वात मोठी व्यवहारिक भाषा असून, बाॅलीवूडसह विविध क्षेत्रात रोजगार निर्मितीमध्ये हिंदी भाषेचे महत्त्वाचे योगदान आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. सदानंद भोसले यांनी केले.
या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन विद्यार्थी प्रबोधन पंधरवड्याच्या निमित्ताने हिंदी विभागाच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या विशेष प्रबोधन सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आभासी तथा दूरदृश्य प्रणाली (‘झूम’ प्रणाली ) च्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. चौधरी यांनी भूषविले. याप्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले .
यावेळी पुढे बोलताना डॉ. सदानंद भोसले म्हणाले की, हिंदी भाषा कौशल्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. मात्र त्यासाठी हिंदीचे रचनात्मक ज्ञान अवगत केले पाहिजे असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी म्हणाले की, भाषा आणि व्यवहार यांचा संबंध अत्यंत जवळचा असून ज्याने भाषेवर प्रभुत्व मिळविले तोच व्यवहारात यशस्वी होऊ शकतो. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ. नागराज मुळे यांनी केले तर आभार डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. या कार्यक्रमात ‘ झूम’ च्या माध्यमातून महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी तथा हिंदी भाषाप्रेमी मोठ्या संख्येंने उपस्थित होते.