व्यापारी निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करतील पण संपूर्ण लॉकडाऊनला कायम विरोध : प्रदीप सोलंकी

व्यापारी निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करतील पण संपूर्ण लॉकडाऊनला कायम विरोध : प्रदीप सोलंकी

लातूर (प्रतिनिधी) : कोरोनापासून बचावासाठी शासन – प्रशासनाने सुचविलेल्या निर्बंधांचे पालन लातूर शहर व जिल्ह्यातील व्यापारी बांधव काटेकोरपणे करतील. परंतु संपूर्ण लॉकडाऊनला व्यापारी महासंघाचा कायम विरोध राहणार असल्याचे मत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रदीप सोलंकी यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये व्यक्त केले आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात प्रदीप सोलंकी यांनी पुढे असे नमूद केले आहे की, सर्व व्यापारी बांधवांचे तसेच दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले आहे. तसेच बहुतांश व्यापाऱ्यांनी आपल्या दुकान – व्यापारी प्रतिष्ठानावर ‘ नो मास्क – नो एंट्री ‘ चे बोर्ड लावले आहेत. सॅनिटायझरची व्यवस्था पण करून दिली आहे. कोरोनाच्या पहिल्या – दुसऱ्या लाटेत शासन – प्रशासन तसेच नागरिकही काही बाबतीत अनभिज्ञ होते. त्यामुळे पूर्ण लॉकडाऊन लावण्यात आल्याने सर्व व्यवहार ठप्प राहिल्याने सगळ्यात जास्त नुकसान व्यापाऱ्यांचे झाले. लहान – मोठ्या व्यापाऱ्यांचे आर्थिक गणित पुरते कोलमडल्याने त्यांचे कंबरडेच मोडले. लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या. व्यापार बंद राहिला असला तरी व्यापाऱ्यांचे कर्जाचे हप्ते, नोकरांचा पगार, विविध प्रकारचे कर तसेच अन्य खर्च चालूच होता. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर योजनेचा काही प्रमाणात व्यापाऱ्यांना फायदा झाला. पण ती मदत अपुरी होती. त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांना बँकेकडून कर्ज मिळाले पण त्याचा जास्त फायदा झाला नाही. अजूनही व्यापाराला म्हणावी तशी गती आलेली नाही. व्यापारातील अडचणीमुळे अनेक व्यापाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण झाले तर अनेकांनी आत्महत्येचा मार्गही अवलंबला आहे. त्यातच पुन्हा शासनाने निर्बंध लावले आहेत.
संपूर्ण लॉकडाऊन लावला गेला तर पुन्हा छोटे व्यापारी , हातावर पोट असणाऱ्यांचे अतोनात हाल होणार आहेत. त्यामुळे प्रशासनावर लॉकडाऊन लागू करायची वेळ येऊ नये म्हणून व्यापारी बांधव निर्बंधाचे काटेकोरपणे पालन करण्यास तयार आहेत. पुढच्या महिन्यात पुन्हा लग्नसराईचा मौसम सुरु होणार आहे. त्यासाठीही खबरदारीचा उपाय म्हणून सगळे व्यापारी सर्वतोपरी काळजी घेतच आहेत. व्यापारी महासंघाचे प्रशासनाला कायम सहकार्य राहत आले आहे व पुढील काळातही ते कायम राहील. संपूर्ण लॉकडाऊन कोणालाही परवडणारा नाही. याची जाणीव ठेवून व्यापारी बांधवांनी सध्या लागू असलेल्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहनही प्रदीप सोलंकी यासह व्यापारी महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

About The Author