मराठवाड्याचा मागासलेपणा दूर करण्यासाठी डॉ. जवळगेकर यांचे प्रबंध मोलाचे ठरणार

मराठवाड्याचा मागासलेपणा दूर करण्यासाठी डॉ. जवळगेकर यांचे प्रबंध मोलाचे ठरणार

भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांचे प्रतिपादन

लातूर (प्रतिनिधी) : लातूर मराठवाड्याच्या मागासलेपणावर अभ्यास करुन पदवी प्राप्त करणारे डॉ. रत्नराज जवळगेकर यांनी हा मागासलेपणा नष्ट करण्यासाठी प्रबंधाच्या माध्यमातून शासनाला पाचशे सूचना केल्या आहेत. या सूचना मागासलेपणा घालवण्यासाठी अत्यंत मोलाच्या असून खऱ्या अर्थाने मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी पक्ष जात आणि धर्म बाजूला ठेवून काम केल्याशिवाय हे शक्य नाही असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी केले.

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईटस मिशनच्या वतीने डॉ. रत्नराज जवळगेकर यांना विद्यावाचस्पती पीएचडी ही पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर हे होते. याप्रसंगी लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भारतबाई साळुंके, बाजार समितीचे संचालक विक्रम शिंदे, प्रदेश भाजपाचे अमोल पाटील, संघर्ष समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस आमोल नान्नजकर, प्रदेश अध्यक्षा ॲड. राणीताई स्वामी, जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत शिंदे, तालुकाध्यक्ष महेश पाटील, माजी शिक्षणाधिकारी आर.पी. गायकवाड, आकाश गडगडे, पुष्पाताई मुसळे यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

मराठवाड्यातील नेत्यांनी देशाचे आणि राज्याचे नेतृत्व केले मात्र त्यांनी या भागाकडे दुर्लक्ष केल्याने आणि इच्छाशक्तीचा अभाव असल्याने मराठवाडा मागास राहिला असे सांगून यावेळी बोलताना आ. कराड म्हणाले की पश्चिम महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते आपल्या भागासाठी एकत्रितपणे काम करतात त्यातूनच त्या भागाचा सर्व पातळीवर मोठ्या प्रमाणात विकास झाल्याचे दिसून येते. मराठवाड्यातील लोकप्रतिनिधीसह सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्याची मानसिकता बदलली पाहिजे पक्ष जात धर्म यापुढे जाऊन मराठवाड्याच्या हितासाठी काम करावे असे आवाहन केले.

याप्रसंगी डॉ. रत्नराज जवळगेकर यांनी मराठवाड्याच्या ऐतिहासिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी राजकीय इच्छाशक्ती, आर्थिक स्त्रोत, औद्योगिक विकासाचा अभाव याचा सविस्तर अभ्यास करून त्यावर कोणते ठोस पर्याय केले जाऊ शकतात याबाबतच्या सूचना प्रबंधाच्या माध्यमातून शासनाकडे केली असल्याची माहिती देऊन मराठवाड्याच्या हितासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे असे बोलून दाखविले. याप्रसंगी इतिहास तज्ञ विवेक सौताडेकर यांनी या सत्काराच्या आयोजनामागची भूमिका विशद करून डॉ. रत्नराज जवळगेकर यांचे प्रबंध मराठवाड्याच्या प्रगतीसाठी निश्चितपणे कामी येतील असे बोलून दाखविले या कार्यक्रमास सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author