किराणा उधार न दिल्याने दुकानाची तोडफोड
पिंपरी (प्रकाश इगवे) : किराणा सामान उधार न दिल्याने तोडफोड व नासधूस करून दुकानाच्या गल्ल्यातून आणि एका व्यक्तीच्या खिशातून हजारो रुपये जबरदस्तीने चोरून नेले. लांडेवाडी भोसरी येथे सोमवारी (दि. १०) सायंकाळी सहा आणि बुधवारी (दि. १२) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. विकास लादूराम चौधरी (वय २७, रा. भोसरी गावठाण) यांनी या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मुन्ना तिवारी (वय २७), शिवम् पांडे (वय २५), रमजान (वय अंदाजे २८) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे लांडेवाडी येथे रामदेव सुपर मार्केट नावाचे किराणा मालाचे दुकान आहे. फिर्यादीने आरोपींना किराणा सामान उधार दिले नाही. त्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीच्या दुकानात तोडफोड केली. अंडी आणि इतर किराणा सामानाचे नुकसान केले. दुकानाच्या गल्ल्यातील एक हजार ५०० रुपये रोख रक्कम आणि अशोक चौधरी यांच्या खिशातून पाच हजार रुपये रोख रक्कम आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतली. फिर्यादी आणि दुर्गाराम चौधरी यांना आरोपींनी दगड फेकून मारले.
