नगरसेविकेच्या बंगल्यावर तलवार व कोयत्याने वार

नगरसेविकेच्या बंगल्यावर तलवार व कोयत्याने वार

राजकीय वैमनस्यातून घडला प्रकार

पिंपरी (रफिक शेख) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविकेच्या बंगल्याच्या गेटवर तलवार व कोयत्याने वार करून शिवीगाळ केली. तसेच दहा वाहनांची तोडफोड करून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दहशत निर्माण केली. ओम कॉलनी, चिंचवड येथे बुधवारी (दि. १२) रात्री ११च्या सुमारास ही घटना घडली. ज्ञानेश्वर रामभाऊ सूर्यवंशी (वय ५६, रा. ओम कॉलनी, चिंचवड) यांनी या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, शिवानंद हेळवे, बसवराज हेळवे, आदित्य आंबुसकर, सोमनाथ माने, श्याम कोळी व त्यांचे इतर साथीदार (नाव व पत्ता माहीत नाही) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची पत्नी आशा सूर्यवंशी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका आहेत. आरोपींनी त्यांच्या घरासमोर येऊन राजकीय वैमनस्यातून फिर्यादी व त्यांच्या मुलाचे नाव घेऊन मोठमोठ्याने शिवीगाळ केली. तसेच, फिर्यादीच्या बंगल्याच्या गेटवर तलवार व कोयता मारून फिर्यादी, त्यांची पत्नी व मुलगा यांना आरोपींनी शिवीगाळ केली. रस्त्यावर पार्क केलेल्या दहा वाहनांची आरोपींनी तोडफोड केली. तसेच, रोहित अनिल पवार यांच्या चारचाकी वाहनातून दहा हजार रुपये आरोपींनी चोरून नेले. आरोपींनी राजकीय वैमनस्यातून हा प्रकार केला आहे, असा आरोप फिर्यादी सूर्यवंशी यांनी केला आहे.

About The Author

error: Content is protected !!