कुटुंब आणि समाजामध्ये भावनीक नाते जपा
मानसोपचार तज्ञ डॉ. नितीन आळंदकर यांचे प्रतिपादन.
अहमदपूर (गोविंद काळे) : covid-19 मुळे समाजातील संकटे आणि मानसिक समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिक दिशाहीन बनला त्यामुळे कुटुंब आणि समाजामध्ये भावनिक नाते जपा तरच आदर्श समाज व संस्कारक्षम पिढी निर्माण होईल असे जाहीर आवाहन प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. नितीन आळंदकर यांनी केले. ते दिनांक 12 जानेवारी रोजी संत ज्ञानेश्वर विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या वतीने जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत गणेश शिक्षण प्रसारक मंडळातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समुपदेशन व आरोग्य सेवा कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन शिबिरा प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार विजेत्या आशा रोडगे प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे समन्वयक कुलदीप हाके, चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका शिवलिका हाके, मराठी विषयाचे तज्ञ रामलिंग तत्तापुरे ,लक्ष्मण जिलेवाड, राजकुमार बुरले, मीना तोवर सह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. नितीन आळंदकर पुढे बोलताना म्हणाले की ,लॉकडाऊन मुळे पती पत्नीचे वाद, मुलामुलींचे वाद, लहान मुला मुलींच्या समस्या जीवघेण्या बनल्या , कोणतीही गोष्ट अति करणे म्हणजे मानवी मन पटलाला घातक आहे. पालक दिशाहीन बनलेला असल्याचे सांगून सुखी समाज निर्माण करण्यासाठी समाधानी होणे आवश्यक आहे.मनामध्ये अती विचारांचा गुंता धोकादायक आहे. त्यामुळे जीवन सकारात्मक करण्यासाठी कोणाचेही बोलणे अति मनाला लागू न घेता आनंदी जीवन जगा असे सांगितले. अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापक आशा रोडगे-तत्तापुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी युगपुरुष स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून अपूर्वा देशमुख, वैभवी देवशेट्टे यांनी स्वागत गीताने शब्द सुमनांनी स्वागत केले. प्रास्ताविक मीना तोवर, सूत्रसंचलन संगीता आबंदे यांनी पाहूण्यांचा परिचय सतीश साबणे यांनी तर आभार नंदकुमार मध्येवाड यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
