पाझर तलाव दुरूस्तीसाठी १७.७६ कोटी रुपये निधी मंजूर
तालुक्यातील सिंचन क्षेत्रात वाढ होणार – मा.ना.श्री.संजय बनसोडे, राज्यमंत्री.
लातूर (प्रतिनिधी) : उदगीर व जळकोट येथील पाझर तलाव दुरूस्तीसाठी १७.७६ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. यात उदगीर तालुक्यातील ३९ पाझर तलाव दुरूस्तीसाठी १३ कोटी ३५ लक्ष निधी तर जळकोट येथील २३ पाझर तलाव दुरूसतीसाठी ४ कोटी ४१ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. या पाझर तलाव दुरूस्तीतून सिंचनाच्या क्षेत्रात भरीव वाढ होणार आहे. शेतकऱ्यासाठी आवश्यक असणारे व जळकोट सारख्या डोंगरी तालुक्यातील शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारे हे पाझर तलाव शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती आणणारे ठरणार आहेत. मागील अनेक वर्षापासुन या भागातील शेतकऱ्यांची या पाझर तलाव दुरूस्ती बाबत मागणी होती. शासनाने ही मागणी मान्य केली असुन यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा,सार्वजनिक बांधकाम पर्यावरण राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांनी दिली आहे.
उदगीर व जळकोट तालुक्यात जलसंधारण विभागा मार्फत रोहयो अंतर्गत पाझर तलाव, गाव तलावाची कामे साधारणत: २० ते २५ वर्षापुर्वी करण्यात आलेली आहेत. या तलावास बऱ्याच वर्षापासुन देखभाल व दुरूस्ती न झाल्याने तलावावर मोठया प्रमाणात झाडे झुडपे उगवल्याने तलावास धोका निर्माण झाला आहे. तसेच तलावाची दुरूस्ती न झाल्याने तलावाची पाळु दबलेली असुन तलावाच्या भराव कामातून पाण्याची गळती होते व बऱ्याचशा तलावास अतिवृष्ठी मध्ये धोका निर्माण झाल्याने तलावाचा सांडवा बांधकाम फोडण्यात आले आहे. यामुळे तलावाचा पाणीसाठा कमी होऊन सिंचन क्षेत्रातही घट झाली होती.
या नादुरूस्त तलावाची दुरूस्ती करण्याकरिता शासनाने मा.मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना अंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे सुचीत केले होते. त्यानुसार उदगीर व जळकोट तालुक्यातील अत्यंत धोकादायक तलावाचे सर्वेक्षण करुन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जलसंधारण विभागास देण्यात आले होते. त्यानुसार जलसंधारण विभागाने या तलावाची पाहणी करुन उदगीर तालुक्यातील ३९ व जळकोट तालुक्यातील २३ पाझर/गाव तलाव दुरूस्तीचे अंदाजपत्रक तयार करुन प्रशासकिय मान्यते करिता शासनास सादर करण्यात आले होते. या अंदाजपत्रकाचा शासन स्तरावर पाठपुरावा करुन मृद व जलसंधारण विभागाने उदगीर तालुक्यातील पाझर/गाव तलाव ३९ किंमत रु.१३ कोटी ३५ लक्ष व जळकोट तालुक्यातील पाझर/गाव तलाव २३ किंमत रु.०४ कोटी ४१ लक्ष रक्कमेस प्रशासकिय मान्यता दिलेली आहे. यामुळे उदगीर व जळकोट तालुक्यातील दुरूस्त झालेल्या पाझर तलावातुन १५२२ सघमी पाणीसाठा निर्माण होऊन ३२८ हे. क्षेत्र पुर्नस्थापीत होणार आहे.अशी माहिती राज्याचे पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली