नगरसेवकांकडून महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण
पुणे (प्रकाश इगवे) : महावितरण नवी पेठ शाखेचे कर्मचारी सफल शांताराम आता हे सहकारी सुनील संतोष कोळी यांच्यासमेवत शुक्रवारी (दि.१३) पीएमसी कॉलनी, साने गुरुजी वसाहत, आंबील ओढा येथे वीज बिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करीत होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर हे दोन्ही कर्मचारी व्ही. के. जाधव या थकबाकीदार ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेले होते. तेथे एका महिलेने फोन लावल्यानंतर आलेल्या धनजंय जाधवने ‘मला ओळखत नाही का, मी माजी नगरसेवक आहे. तू कोणाच्या दारात आला आहेस’, असा जाब विचारत शिवीगाळ केली, तसेच एका अनोळखी इसमाच्या साथीने कर्मचारी सफल आताग्रे यांच्या पोटावर व डोक्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शासकीय गणवेश फाडून टाकला. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध दत्तवाडी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरे कर्मचारी सुनील कोळी यांनी आताग्रे यांना दोघांच्या तावडीतून सोडवले व प्रकाराची वरिष्ठांना माहिती दिली. त्या ठिकाणी नवी पेठ व पेशवेपार्क कार्यालयातील अधिकारी गेल्यानंतर त्यांनाही शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी धनजंय जाधव व एका अनोळखी इसमाविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
