व्यावसायिकाला ७ लाखाला फसवले
पुणे (प्रकाश इगवे) : गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची पावणेसात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शैलेंद्र पाटील (वय ४९) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नितीन चंद्रकांत नाईक (रा. सुभाषनगर, शुक्रवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जून २०१४ ते २०२२ या कालावधीत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील हे व्यावसायिक आहेत. दरम्यान, त्यांची व आरोपीची ओळख होती. त्याने पाटील यांना हॉटेल, इलेक्ट्रिकल, जिम आणि बांधकाम व्यावसाय असल्याचे सांगितले. तसेच, हॉटेल साहिल व सिमृत फूड या कंपन्यांचा विस्तार करायचा असल्याचे सांगून त्यात पैसे गुंतवणूक करायची असल्याचे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला.
गुंतवणूक केल्यास त्यावर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यांच्याकडून वेळोवेळी एकूण ६ लाख ८९ हजार रुपये घेतले. त्याबदल्यात त्यांना एक चेक दिला होता; परंतु तक्रारदारांनी दिलेल्या रकमेचा अपहार करून त्यांची फसवणूक केली.
