भिशीच्या बहाण्याने १० कोटींची फसवणूक
पुणे (रफिक शेख) : भिशीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळण्याचे आमिष दाखवत प्रत्येक महिन्याला अडीच लाख रुपये भरण्यास सांगत अनेकांची १० कोटी ६५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाम्पत्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. न्यायाधीस पी. पी. जाधव यांनी हा आदेश दिला. चेन्नकेशवल्लू चेन्नया रामगिरी व सुजाता चेन्नकेशवल्लू रामगिरी (रा. बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) असे जामीन फेटाळण्यात आलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी ३८ वर्षीय महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार रामगिरी पती- पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा प्रकार मार्च २०१८ ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत घडला आहे. तक्रारदार व आरोपींची ओळख आहे. दरम्यान, या दोघांनी तक्रारदार, तसेच इतर महिलांना भिशीची स्कीम सुरू केल्याची माहिती दिली. त्यांना पैसे गुंतविल्यास जास्त नफा मिळेल असे सांगत या महिलांचा विश्वास संपादन केला. यानंतर प्रत्येक महिन्याला अडीच लाख रुपये भरण्यास सांगितले. बोली भिशी असल्याचे सांगत त्यांना चांगला परतावा मिळाला असल्याचे भासवले.
या महिलाकडून रुपये घेतले. भिशीची मुदत संपल्यानंतर तक्रारदार या परतावा मागण्यास गेल्या असता त्यांना व इतर महिलांना परतावा न देता त्यांची फसवणूक केली, असे तक्रारीमध्ये नमूद आहे. या प्रकरणात रामगिरी जोडप्याने जामिनासाठी अर्ज केला होता. त्यास सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी विरोध केला. या प्रकरणात फसवणूक झालेल्यांची संख्या आणि रक्कम वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा जामीन फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद अँड. अगरवाल यांनी केला. तो न्यायालयाने ग्राह्य धरीत दाम्पत्याचा जामीन फेटाळला.
