बिर्याणीचे पैसे मागितले म्हणून मारहाण
पुणे (योगिता कोरे) : बिर्याणीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एका केटरिंग व्यावसायिकाला तिघांनी सळईने मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मईनुद्दीन खान (४२, रा. काळे बोराटेनगर, हडपसर) यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. तुकाई टेकडीजवळील यशराज ग्रीन कास्टल येथे हा प्रकार बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान हे केटरिंगचे काम करतात. त्यांचे हडपसर येथील तुकाई टेकडी जवळ यशरज ग्रीन कास्टल हॉटेल कम दुकान आहे. आरोपींनी खान यांच्याकडून बिर्याणी घेतली परंतु, त्याचे पैसे दिले नाही.
