कुलगुरूच्या अधिकारात राजकीय हस्तक्षेप करणारा काळा कायदा तात्काळ रद्द करा
अजितसिंह पाटील कव्हेकरांच्या उपस्थितीत भाजयुमोचे राज्यमंत्री बनसोडे यांना साकडे
लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिने डॉ.सुखदेव थोरात माजी अध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली व सदरील अहवालाच्या आधारे अधिनियमात प्रस्तावित सुधारणा करण्यास मंत्रीमंडळाने 15 डिसेंबर 2021 रोजी मान्यता दिली. प्र-कुलपती पदाची तरतूद – महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 मध्ये नव्याने कलम-(अ) समाविष्ठ करून प्र-कुलपती पदाची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्रीही विद्यापीठाचे प्र-कुलपती असतील या तरतूदीमुळे मा.राज्यपाल यांच्या अधिकारांचे हनन करण्याचा प्रकार होत असून या कायद्यामुळे सरकारी क्षेत्रामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढणार आहे. त्यामुळे हा काळा कायदा तात्काळ रद्द करावा. अशा मागणीचे निवेदन भाजपा युवा नेते तथा भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या उपस्थितीत भाजपा युमोच्यावतीने राज्याचे पाणी पुरवठा व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मा.ना.संजयजी बनसोडे यांना देण्यात आले.
या कायद्यामुळे कुलगुरू, प्र-कुलगुरू यांच्यासारख्या इतर महत्त्वाच्या नियुक्तीत राजकीय हस्तक्षेप वाढणार आहे. शासनाला आपल्याच मर्जीतील व्यक्तींची निवड करण्याचे नियोजन होणार असल्यामुळे भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणात होणार आहे. एवढेच नाही तर आपल्या सरकारमधील काही नेत्यांचा डोळा हा केवळ विद्यापीठाच्या जमीनीवर आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री हे विद्यापीठाचे प्र-कुलपती करून विद्यापीठाच्या दैनंदिन कार्यामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढणार आहे. त्यामुळे या काळ्या कायद्याला मान्यता देऊ नये. शैक्षणिक क्षेत्रात होणार्या भ्रष्टाचाराला आळा घालून विद्यापीठासारख्या ज्ञानदानाचे कार्य करणार्या संस्थेमध्ये राजकीय हस्तक्षेप कमी करून विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी योग्य तो हातभार लावावा. अशा मागण्याचे निवेदन राज्यमंत्री, पाणी पुवरठा व सार्वजनिक बांधकाम मंत्री संजय बनसोडे यांना देण्यात आले आहे. यावेळी युवा नेते तथा भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, अॅड.गणेश गोजमगुंडे, वैभव डोंगरे, अॅड.पंकज देशपांडे, व्यंकटेश हंकरगे, संतोष तिवारी, काकासाहेब चौंगुले, राजेश पवार, शुभम स्वामी, महादेव पिटले, ऋषिकेश क्षिरसागर, अमित पोतदार, पंकज भोळे, आकाश पिटले, यशवंत कदम,लक्ष्मण पोतदार, अजय भोळे, चैतन्य फिस्के, महेश साळुंके यांच्यासह भाजपा युमोचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कायदा मागे घेईपर्यंत संघर्ष सुरूच राहील
लातूर शहरामध्ये अनेक शैक्षणिक संस्था आहेत. विद्यापीठ उपकेंद्र आहे. खाजगी क्लासेसचीही संख्या मोठी आहे. त्यामुळे शिक्षणासाठी राज्यासह देशभरातून विद्यार्थी येतात. त्यामुळे विद्यार्थी हित लक्षात घेऊन हा काळा कायदा तात्काळ रद्द करावा. हा कायदा बहुमताने पारीत झाला तर लातूरमध्ये शिक्षण घेणार्या देशभरातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांवरही या कायद्यामुळे राजकीय प्रभाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थी हिताचा विषय लक्षात घेऊन त्या कायद्याच्या विरोधात भाजपा युमोने साखळी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे जोपर्यंत हा काळा कायदा शासन मागे घेणार नाही किंवा तो कायदा रद्द करणार नाही. तोपर्यंत भाजपायुमोकडून सुरू असलेला संघर्ष कायम सुरूच राहील. असा ईशारा भाजपायुमोचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.