महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून बँकेचे कार्यक्षेत्र राज्यात वाढवू – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या माध्यमातून बचत गटाच्या माध्यमातून काम करणार्या महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी माणदेशी फौंडेशनच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊन सध्या महिलांना 50 हजारापर्यंत कर्ज दिले जाते ते वेळेत परतफेड करणार्या महिलांना 1 लाखापर्यतचे कर्ज उपलब्ध करून देऊन उद्योगी बनविण्याचे काम करण्यात येईल. यापुढील कालावधीतही बचतगट व महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र राज्यभरात वाढवू असे प्रतिपादन महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांनी केले.
यावेळी ते महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्यावतीने बचतगटाच्या महिलांना कर्ज वाटप व मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या संचालिका तथा मायक्रो फायनांन्स कर्ज समितीच्या अध्यक्ष जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, बँकेचे तज्ज्ञ संचालक अजितसिंह पाटील कव्हेकर, मनपाच्या माजी सभापती केशरबाई महापुरे, अंबाजोगाई येथील उद्योजक अमोल मुळीक, सहारा शेख, माणदेशी फौंडेशनच्या शिवपुजे मॅडम, बँकेचे कार्यकारी संचालक अमरदीप जाधव, जॉईंट एम.डी.बाळासाहेब मोहिते, जनरल मॅनेजर गहिरवार, आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले की, महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या माध्यमातून 10 हजार बचत गटाच्या महिलांना सक्षम करण्याचा संपल्प आहे. अद्यापपर्यंत साडेतीन हजार महिलांना विनातारण कर्ज देऊन उद्योगी बनविण्याचे काम केलेले आहे. बचत गटाच्या महिलांना कर्ज, माणदेशी फौंडेशनच्या माध्यमातून प्रशिक्षण व त्यांनी उभारलेल्या उद्योगाचे सक्षमपणे मार्केटिंग करण्याचेही काम बँकेच्या माध्यमातून केले जात आहे. पुढील काळात काही निवडक व्यवसायाची निवड करून त्याचा ब्रँड बनविला जाईल जेणेकरून महिला बचतगटाच्या माध्यमातून बँकेचे कार्यक्षेत्र राज्यभरात वाढेल असा संकल्पही यावेळी बोलताना माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांनी केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली तसेच शेकापचे माजी सरचिटणीस प्रा.एन.डी.पाटील तसेच समाजसेविका पद्मश्री सिंधूताई सपकाळ व कथक सम्राट बिरजू महाराज यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. प्रारंभी बचत गटाच्या माध्यमातून कर्जाची वेळेत परतफेड करणार्या 19 महिलांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले. मांजरी येथील बचत गटाच्या पाच महिलांना प्रत्येकी 50 हजार या प्रमाणे अडीच लाख रूपये कर्जाच्या चेकचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.एन.एस.बँकेचे जनरल मॅनेजर गहेरवार सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार अब्दूल गालीब यांनी मानले.
यावेळी एम.एन.एस.बँकेचे शाखा व्यवस्थापक शिवाजी सूर्यवंशी, एम.एन.एस.बँकेचे मायक्रो फायनांन्स विभाग प्रमुख दीपक डांगे, माधवी बेलुरे, प्रगती वाकुरे, गणेश गायकवाड, राहूल राठोड, शंकरानंद स्वामी, आशिष काटे यांच्यासह बँकेतील कर्मचार्यांची उपस्थिती होती.
ज्ञानाच्या वाणातून महिला सक्षम होतील- माजी जि.प.अध्यक्षा सौ.कव्हेकर
महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या माध्यमातून हजारो महिलांना विनातारण कर्ज देऊन सक्षम करण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून केले जात आहे. यातील बहूतांश महिला सक्षम झाल्या असून त्यांनी उचललेल्या कर्जातून परतफेड करून मोठे उद्योग उभारण्याच बर्याच महिलांचा माणस आहे. त्यामुळे त्यांना 50 हजार ते 1 लाखापर्यंतचे कर्ज देऊन महिला बचत गटांना सक्षम करण्याचे काम महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या माध्यमातून अविरतपणे केले जाणार आहे. या ज्ञानाच्या वाणातून महिला दूग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन व गारमेंटसारखे उद्योग उभारून आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील असा विश्वास महाराष्ट्र नागरी सहकारी बँक मायक्रो फायणांन्स कर्ज उपसमितीच्या अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी व्यक्त केला.
बचत गटाच्या महिलांकडून एम.एन.एस.बँकेचे आभार महाराष्ट्र नागरी बँकेच्या माध्यामातून कर्जरूपी मिळालेल्या आधारामुळे आम्ही आर्थिकदृष्टया सक्षम झालेलो आहोत. यापुढील कालावधीतही बँकेचे सहकार्य राहिले तर मोठ्या उद्योगाची उभारणी करून त्यातही आम्ही सक्षमपणे काम करू बँकेच्या आर्थिक आधारावरच पुढील वाटचालही यशस्वीपणे करू. बँकेच्या या सहकार्याबद्दल एम.एन.एस.बँकेचे शतशः आभार अशी भावनाही सहारा शेख, गुलाबशहा मनियार व मांजरी येथील बचतगटाच्या महिलांनी व्यक्त केली.