कंपनीच्या बनावट लोगोचा वापर; दोघांना अटक
पिंपरी (रफिक शेख) : कंपनीच्या बनावट लोगो वापरून विक्रीसाठी साहित्य बाळगल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. मुकाई चौकातील आयुष या दुकानात आणि डांगे चौकातील ऑरिक्स अॅक्वा दुकानात सोमवारी (दि. १७) ही कारवाई केली. नारायण गुलाब पाटील (वय २८, रा. मुकाई चौक, देहूरोड), कौशल विष्णू चांदेरे (वय १८, रा. सुसगाव), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. राकेश राम सावंत (वय ३७, रा. प्रभादेवी, मुंबई) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. १७) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नारायण पाटील याचे मुकाई चौकात आयुष इंटरप्रायजेस नावाचे दुकान आहे. त्या दुकानात त्याने हिंदुस्थान युनिलिव्हर प्रा. लि. या कंपनीच्या नावाचा बनावट लोगो वापरून त्याआधारे आरओमध्ये वापरले जाणारे जर्म किलर आणि अन्य साहित्य ग्राहकांना विक्रीसाठी बाळगले. दुकानात, एक लाख ४८ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. आरोपी पाटील याला डांगे चौकातील ऑरिक्स अॅक्वा या दुकानदाराने हा माल दिला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे कौशल चांदेरे याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यालाही अटक केली.