ह्युमन राईट च्या नावाखाली मागितली खंडणी
पिंपरी (प्रकाश इगवे) : आम्ही ह्यूमन राईटचे अधिकारी आहोत, तुमच्या विरोधात महिलेने तक्रार केली आहे, असे सांगून काही पैसे रोख स्वरूपात घेतले. तसेच आणखी ३० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. या प्रकरणी चार जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना २५ ऑक्टोबर २०२१ रोजी नाशिक फाटा येथे घडली.
इम्तियाज अहमद हुसेन (वय ६३, रा. पुलगेट, पुणे) यांनी बुधवारी (दि. १९) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सलीम सय्यद (वय ४०), हबीब सय्यद (वय ३७), हाजी गुलाम रसूल सय्यद (वय ६०) आणि स्टॅम्प पेपरवर हसीना बशीर मुलाणी असे नाव असलेल्या अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल केला. अधिक माहितीनुसार, आरोपी सलीम सय्यद याने फोन करून फिर्यादीला नाशिक फाटा येथील एका हॉटेलवर बोलावले. फिर्यादी तेथे आले असता तेथे सलीम सय्यद, हबीब सय्यद आणि हाजी गुलाम रसूल सय्यद हे तिघे जण होते. त्यापैकी आरोपी सलीम आणि हबीब यांनी ह्युमन राईट अधिकारी असल्याचे सांगितले. तुमच्या विरोधात एका महिलेने तक्रार दिली असल्याचे सांगितले. आरोपी सलीम याने फिर्यादीला कारवाई करण्याची धमकी दिली. तसेच आरोपी फिर्यादीकडून १३ हजार ५०० रुपये रोख स्वरूपात घेतले. तसेच फिर्यादीला संबंधित महिलेने लिहून दिलेला शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर दिला. क्राइम ब्रॉचचे अधिकारी जाधव यांच्यासोबत फोनवर बोलून प्रकरण मिटवण्यासाठी ३० हजार रुपयांची मागणी केली.