मराठी भाषेला रोजगाराभिमुख बनवून व्यवहारात उपयोजन करणे आवश्यक – डॉ. राजकुमार यल्लावाड
अहमदपूर (गोविंद काळे) : भाषा ही सांस्कृतिक आणि सामाजिक अभिसरणाची जननी असते. म्हणून भाषेला रोजगाराभिमुख बनवून तिचे दैनंदिन व्यवहारात उपयोजन होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन परळी येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद च्या मराठी अभ्यास मंडळाचे माजी सदस्य प्रा. डॉ. राजकुमार यल्लावाड यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचालित महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूरच्या मराठी विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासन व उच्च शिक्षण विभाग यांच्या आदेशान्वये गुगल मीट या दूरदृश्य प्रणालीद्वारे ‘मराठी भाषेचे व्यवहारात उपयोजन ‘ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ‘ निमित्त विशेष व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन परळी येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद च्या मराठी अभ्यास मंडळाचे माजी सदस्य प्रा. डॉ. राजकुमार यल्लावाड हे उपस्थित होते .यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, जी भाषा रोजगार देता नाही त्या भाषेपासून लोक दूर जातात. त्यासाठी मराठी माणसाने रोजगार निर्माण करने आवश्यक आहे. तसेच यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून मराठी भाषेचे व्यवहारात उपयोजन करणे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी ब्लॉक, युट्यूब, प्रतिलिपी असे असंख्य माध्यमे तर आहेतच त्याबरोबर प्रसारमाध्यमे, चित्रपट,नाटक, प्रकाशन संस्था आदी क्षेत्रात रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत त्यासाठी आपले भाषेवर प्रभुत्व असणे ही गरजेचे आहे, असे ही ते म्हणाले .
अध्यक्षीय समारोपाप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, मराठी भाषेचं आस्तित्व कधीच संपणार नाही कारण मराठी माणूस रडणाऱ्यापैकी नसून तो लढणाऱ्यापैकी आहे. मराठीच्या उज्वल भविष्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने आपल्या जीवन व्यवहारात मराठी भाषेचा उपयोग अभिमानाने केला पाहिजे असे ही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय प्रो. डॉ. अनिल मुंढे यांनी करून दिला तर सूत्रसंचलन डॉ.मारोती कसाब यांनी केले तर आभार कु. संजीवनी येडले ने मानले. यावेळी ऑनलाईन आभासी पध्दतीने मराठी भाषेचे अभ्यासक, संशोधक, महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येंने उपस्थित होते.