संविधानाबद्दलचा श्रध्दाभाव आंबेडकरवादी मराठी साहित्यातून प्रकट – डॉ. कीर्तिकुमार मोरे
अहमदपूर (गोविंद काळे) : विचार प्रर्वतक साहित्य कसं असावं याच सुंदर उदाहरण आंबेडकरवादी साहित्य आहे. त्यात तथागत गौत्तम बुद्धांप्रती कृतज्ञता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लोकशाहीची जाणिव होती म्हणून भारतीय संविधानाबद्दलचा श्रध्दाभाव आंबेडकरवादी साहित्यांने मराठी माणसाला दिला, असे प्रतिपादन गंगाखेड येथील संत जनाबाई महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रो. डॉ.कीर्तिकुमार यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचालित महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूरच्या मराठी विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासन व उच्च शिक्षण विभाग यांच्या आदेशान्वये गुगल मीट या दूरदृश्य प्रणालीद्वारे ‘ आंबेडकरी साहित्याने मराठी भाषेला काय दिले? ‘ या विषयावर प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ‘ निमित्त विशेष व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभागप्रमुख प्राचार्य डॉ. सतीश ससाणे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन गंगाखेड येथील संत जनाबाई महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख तथा ज्येष्ठ समीक्षक प्रो. डॉ.कीर्तिकुमार हे उपस्थित होते . कार्यक्रमाच्या सुरूवातीला स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी पुढे बोलतांना प्रो. डॉ.कीर्तिकुमार मोरे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे समाजात जे परिवर्तन झाले त्या परिवर्तनाची नोंद घेणारं आंबेडकरवादी साहित्य आहे.डॉ. आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि अन्यायाविरूद्ध संघर्ष करा हा मोलाचा संदेश देणारं साठनंतरचं मराठी आंबेडकरवादी साहित्य आहे, असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोपाप्रसंगी डॉ. सतीश ससाणे म्हणाले की, मराठी भाषेचं आस्तित्व कधीच संपणार नाही कारण मराठी साहित्यातून सन १९६० नंतर समाजाच्या भाषेतून वास्तववादी चित्रण होत आहे. काय नाकारावे आणि काय स्विकारावे हे आंबेडकरवादी साहित्याने मराठी साहित्याला शिकविले असेही ते शेवटी म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय प्रो. डॉ. अनिल मुंढे यांनी करून दिला तर सूत्रसंचलन डॉ.मारोती कसाब यांनी केले तर आभार कु. क्रांती राठोड ने मानले. यावेळी ऑनलाईन आभासी पध्दतीने मराठी भाषेचे अभ्यासक, संशोधक, महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येंने उपस्थित होते. कार्यक्रमाची सरूवात वंदे मातरम् ने तर सांगता राष्ट्रगीताने झाली.