शिवसेनेला वगळून विकासकामांचे भूमिपूजन
ग्रामीण भागात शिवसेनेला अपमानित करण्याचा काँग्रेसचा डाव
शिवसेनेला जाणूनबुजून डावलले जात असल्याचा संशय
– उपजिल्हाप्रमुख सचिन दाने
रेणापूर (प्रतिनिधी) : शिवसेनेच्या नेतृत्वात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कार्यरत आहे परंतु सत्तेसाठी सरकारमध्ये सहभागी झालेल्या काँग्रेस पक्षाकडून ग्रामीण भागात भागातून शिवसेनेला अपमानित करण्याचा डाव आखला जात आहे.याच कारणाने शिवसेनेच्या मंत्र्यांकडून निधी आणूनही रेणापूर येथील भूमिपूजन सोहळ्यात शिवसेनेला जाणून-बुजून डावलल्याचा संशय उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी व्यक्त केला.
रेणापूर येथे गुरुवारी ९.६० कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन कॉंग्रेस नेत्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शिवसेनेला साधे निमंत्रणही देण्यात आले नाही.या पार्श्वभूमीवर दाने यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
ते म्हणाले की,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसही सहभागी आहे.तीन पक्षांची आघाडी असल्याने एकमेकांना विश्वासात घेऊन विकासकामे करणे आवश्यक आहे.जनतेच्या हिताची कामे करताना पक्षीय हेवेदावे बाजूला सारणे गरजेचे आहे. जनसेवा करता यावी,विकास कामे राबवता यावीत या हेतूने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारत महाविकास आघाडीला सत्ता मिळवून दिली.परंतु सत्तेचा मेवा चाखत असताना काँग्रेसला या बाबींचा विसर पडला आहे.
रेणापूर नगरपंचायत अंतर्गत विविध विकास कामांसाठी शिवसेना नेते तथा वरिष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. याच निधीतून करण्यात येणाऱ्या विविध कामांचे भूमिपूजन गुरुवारी रेणापूर येथे पालकमंत्री अमित देशमुख,राज्यमंत्री संजय बनसोडे,आ.धीरज देशमुख,
माजी आमदार त्र्यंबक भिसे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.हा कार्यक्रम महाविकास आघाडीचा आहे असे म्हटले गेले परंतु प्रत्यक्षात महाविकास आघाडीतील मोठा भाऊ असणाऱ्या शिवसेनेला जाणीवपूर्वक कार्यक्रमापासून दूर ठेवले गेले.राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मात्र व्यासपीठावर स्थान मिळाले.
शिवसेनेच्या नेत्याकडे असणार्या खात्या अंतर्गत निधी मंजूर करून आणायचा आणि त्याच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमाचे निमंत्रणही द्यायचे नाही,असा दुहेरी डाव काँग्रेसने या निमित्ताने टाकल्याचे उघड झाले.आघाडीचा कार्यक्रम न करता त्याला पक्षीय स्वरूप देण्यात आले.या माध्यमातून ग्रामीण भागात शिवसेना वाढू नये याची काळजी काँग्रेस नेत्यांकडून घेतली गेली.
शिवसेना महाविकास आघाडीचा धर्म पाळत आहे आणि राहील पण काँग्रेसनेही आघाडी धर्म पाळावा.
शिवसेना आज रेणापूर तालुक्यात छोटा पक्ष असेल तरी मतदारसंघात आपली निर्णायक ताकद पाळून आहे.प्रत्येक शिवसैनिक स्वाभिमानी आहे.शिवसेना रेणापूर तालुक्यात स्वाभिमानानेच राजकारण करत राहील असे सचिन दाने यांनी सांगितले.झालेल्या प्रकारावर नाराजी व्यक्त करून ही गंभीर बाब वरिष्ठ शिवसेना नेत्यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत असे त्यांनी सांगितले.