तरुणाचा एकतर्फी प्रेमातून खून
पिंपरी (प्रकाश इगवे) : पडक्या घरात तरुणाचा मृतदेह आढळला होता. मावळ तालुक्यातील चांदखेड गावाच्या हद्दीतील चंदनवाडी येथे एका १९ जानेवारीला हा चंदनवाडी येथे १९ जानेवारीला हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांना यश आले. एकतर्फी प्रेमाच्या कारणावरून एका महिलेसह सात जणांनी मिळून हा खून केल्याचे समोर आले.
सचिन नाथा पवार (वय २९, रा. देवाची ऊरुळी, गणेश नगर, ता. हवेली) असे खून झालेल्याचे नाव आहे. रोहिणी अमोल आव्हाळे, संतोष ऊर्फ अप्पा पोपट पिंजन (वय ३६, रा. भांबोली, ता. खेड), कृष्णा भैरव जाधव (वय ३६, रा. सांमुर्डी, ता. खेड), संपत वैजनाथ लांडगे (वय ३६, रा. बन्हऱ्हाडे, ता. खेड, मूळ रा. विठ्ठलवाडी, उस्मानाबाद), विष्णू रघूकोंडे (वय ३६, रा. नानोली, ता. मावळ), प्रदीप शांताराम तुळवे (वय ३०, रा. करंजविहरे, ता. खेड), नारायण अंबादास आहेर (वय २२, रा. भांबोली, ता. खेड, मूळ रा. रेंदाळे, ता. येवला, जि. नाशिक) यांना पोलिसांनी अटक केली.
सचिन पवार याला रोहिणीने १८ जानेवारीला म्हाळुंगे येथे बोलावून घेतले. त्यानंवर अन्य आरोपीच्या मदतीने सचिन याचे एका चारचाकी वाहनातून अपहरण केले. त्याला करंजविहारे गावच्या हद्दीत जंगलाच्या बाजुला नेऊन लाथाबुक्क्याने तसेच लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून जखमी केले. पुन्हा चारचाकी वाहनात बसवून सचिन पवार यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावून गाडीमध्ये मारहाण केली. काही वेळाने सचिन पवार हा बेशुध्द झाला. त्याची हालचाल बंद झाल्याने त्यास चारचाकी वाहनामधून संतोष पिंजन, नारायण आहेर व प्रदीप शांताराम तुळवे यांनी चांदखेड खिंडीमध्ये जंगलाच्या बाजूला असलेल्या पडक्या इमारतीजवळ नेऊन पुन्हा लोखंडी रॉडने डोक्यावर मारून खोलीमध्ये टाकून दिले.
शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चंदनवाडी येथील पडक्या खोलीत तरुणाचा मृतदेह आढळला. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट पाच करीत होते. २३ जानेवारीला लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एक तरुण बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. त्यातील बेपत्ता तरुणाचे वर्णन चांदखेड येथे मृतदेह आढळलेल्या तरुणाशी जुळत होते. त्यावरून पोलिसांनी तरुणाची ओळख पटवली, सचिन पवार याचे रोहिणी अमोल आव्हाळे या महिलेशी एकतर्फी प्रेम होते, अशी माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांना रोहिणी व तिचा पती अमोल आव्हाळे या दोघांना ताब्यात घेतले. रोहिणीने तिचे दाजी संतोष पिंजन आणि मानलेला भाऊ स कृष्णा जाधव व त्यांचे साथीदार यांच्यासोबत मिळून हा खून केल्याचे कबूल केले. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, सहाय्यक फौजदार धनराज किरनाळे, पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे, नितीन बहीरट, संदीप ठाकरे, अली शेख, भरत माने, राजकुमार इधारे, दयानंद खेडकर, नागेश माळी, पोलीस नाईक अश्विनी कांबळे, विद्या ओगले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
