विवाह समारंभात दोनशेहून अधिक लोकांना अन्नविषबाधा
उदगीर (एल.पी. उगिले/हुकूमत शेख) : उदगीर तालुक्यातील एक मोठी बाजारपेठ असलेल्या वाढवणा गावातील प्रतिष्ठित व्यापारी इसाक हवालदार यांच्या कन्येच्या शुभविवाह प्रसंगासाठी उदगीर, लातूर आणि औशाहुन जवळपास दोन हजारांहून अधिक लोक उपस्थित राहिले होते. या विवाह समारंभासाठी दस्तुरखुद्द राज्यमंत्री संजय बनसोडे ही हजर होते. प्रमुख अतिथी म्हणून त्यांचा यथोचित सत्कार या कार्यक्रमात झाला. या लग्नसमारंभात उपस्थित असलेल्या आबालवृद्धांनी मेजवानीचा आनंद घेतला. मात्र या लग्नसमारंभात भोजनाचा आनंद घेतलेल्या जवळपास दोनशेहून अधिक लोकांना अन्न विषबाधा झाल्याने ते वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल झाले आहेत. आमच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार वाढवणा येथील शासकीय रुग्णालय तसेच सेवा क्लीनिक, अथर्व क्लिनिक यांच्यासोबतच हाळी आणि काही प्रमाणात उदगीर येथील शासकीय रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात अन्न विषबाधा झालेल्या रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांनी दाखल केले आहे. वाढवणा येथील व्यापारी इसाक हवालदार यांच्या मुलीच्या लग्नसमारंभासाठी जिल्हाभरातून अनेक मान्यवर हजर झाले होते. या लग्नसमारंभासाठी मोठ्या प्रमाणात तयारीही करण्यात आली होती. शासकीय रुग्णालयाच्या बाजूलाच हा विवाह सोहळा संपन्न झाला. मात्र विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर काही बालकांना उलट्या संडास होऊ लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या बालकांच्या पाठोपाठ इतरही अनेकांना अन्न विषबाधा झाल्याचे लक्षात आल्यानंतर लोक वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल झाले. वाढवणा गावातील दवाखान्यांची मर्यादित संख्या लक्षात घेऊन रुग्णांच्या नातेवाइकांनी जवळपासचे हळी हंडरगुळी, उदगीर येथील त्यांच्या परिचित असलेल्या खाजगी रुग्णालयात रुग्णांना दाखल केले. जे गंभीर स्वरूपातील बालक होते असे तीन ते चार बालकांना उदगीर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. आमच्या प्रतिनिधीच्या सांगण्यानुसार बातमी लिहीपर्यंत संख्या वाढत असल्याची माहिती हाती आली आहे.
चौकट
आम्ही गंभीर बालकांना तात्काळ उदगीर येथील शासकीय रुग्णालयात हलवले आहे. आमच्या पातळीवरून आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करत आहोत. वाढवणा शासकीय रुग्णालयात दाखल असलेला एकही रुग्ण गंभीर स्वरूपाचा नाही. किंवा त्यांच्या जीवाला धोका नाही.
डॉ. वर्षा कानकाटे
चौकट दोन आम्ही आहोत काळजी नसावी
जिल्हाभरातील ख्यातनाम व्यक्तीमत्व लातूर जिल्ह्याचे आरोग्य दूत म्हणून परिचित असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांना ही माहिती कळल्याबरोबर ते स्वतः वाढवणा गावात हजर राहून सर्व रुग्णांची विचारपूस करू लागले. रुग्ण संख्या वाढू लागल्याने त्यांनी तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर परगे यांच्याशी संपर्क साधून तात्काळ रुग्णवाहिकांची संख्या वाढवली. ज्या रुग्णांना अत्यवस्थ वाटत आहे, त्यांना तात्काळ उदगीर किंवा लातूर येथील रुग्णालयात पाठवण्याची सोय करता यावी. या दृष्टीने त्यांनी प्रयत्न चालू केले आहेत. आमच्या पातळीवर आम्ही कुठेही कमी पडणार नाही.आम्ही आपल्या सेवेत आहोत आपण काळजी करू नका. अशी ग्वाही याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी दिली.
चौकट तीन
वाढवणा गावातील सर्व नागरिक सोबत असून या प्रसंगात आणि सुखदुःखात आम्ही सतत सोबत असून ज्यांना अन्न विषबाधा झाली आहे त्यांना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी मी आणि माझे पती पंचायत समितीचे माजी सदस्य दत्तात्रेय बामणे सतत प्रयत्न करत आहोत.सविता बामणे सरपंच वाढवणा
चौकट चार
पोलीस स्टेशनचा नंबर बंद !
वाढवण्या सारख्या मोठ्या गावातील पोलीस स्टेशनचा फोन नंबर बंद झाल्याने अनेकांना या घटनेच्या संदर्भात अद्यावत माहिती घेता आली नाही. विशेष म्हणजे वाढवणा पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस अधिकारी बाळासाहेब नरवटे यांचाही दूरध्वनी क्रमांक बंद असल्याने पत्रकारांना अत्यावश्यक माहिती घेता आली नाही. गावातील पोलिस स्टेशनचा फोन नंबर चालू ठेवावा. अशी मागणी अनेकांनी केली असली तरीही या संदर्भात कोणतीच कारवाई झाली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
चौकट पाच
पोलीस प्रशासन सर्वतोपरी सज्ज
वाढवना गावात झालेल्या ह्या विषबाधेच्या अनुषंगाने विभागातील सर्व पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून अधिकृत माहिती आम्ही गोळा करत आहोत, आणि जिथे जिथे गरज असेल त्या त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा काम करेल. अशी ग्वाही अमदपुर पोलीस उपविभागीय अधिकारी बलराज लंजिले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. उदगीर, वाढवणा, हळी हंडरगुळी या भागातील विवाह समारंभासाठी उपस्थित असलेल्या लोकांच्या संदर्भात माहिती हाती येत असली तरीही औसा येथून हवलदार यांच्या मुलीच्या लग्नासाठी आलेले बिऱ्हाड यांच्याकडे काही अडचणी आहेत का? या संदर्भात चौकशी करणेही गरजेचे असल्याचे या अनुषंगाने सांगण्यात येत आहे.
बलराज लंजीले, डिवायएसपी अहमदपुर