पालकमंत्री ना. अमित देशमुख यांच्या मतदारसंघातील दयनीय रस्त्यांचा ‘लातूर पॅटर्न’?
आर्वी, साई, नांदगाव, वरवंटी, बसवंतपूर गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे तीनतेरा
लातूर (कैलास साळुंके) : लातूर शहर मतदार संघ हा पुर्वी पासून काँग्रेस चा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 1995 वगळता या मतदारसंघ वर काँग्रेस पक्षाचेच वर्चस्व राहिलेले आहे. 2009 च्या आगोदर लातूर विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा परंतु 2009 साली या मतदारसंघाची पुर्नरचना झाली आणि लातूर शहर व लातूर ग्रामीण असे दोन मतदारसंघ निर्माण झाले. 2009 ला लातूर शहर मतदारसंघाची पुर्नरचना झाल्या पासून आजतागायत या मतदारसंघावर काँग्रेस चे आ. अमित देशमुख यांचे वर्चस्व कायम आहे. परंतु लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित देशमुख यांना स्वताच्या मतदारसंघातील रस्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सपशेल अपयशी ठरलेले दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या या मतदारसंघातील दयनीय रस्त्यांचा लातूर पॅटर्न निर्माण झाला आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांना पडलेला आहे.
2009 साली लातूर शहर मतदारसंघ हा नव्याने अस्तित्वात आला. आणि या मतदारसंघात लातूर शहरा लगत असलेल्या 27 गावांचा समावेश करण्यात आला. परंतु या मतदारसंघातील गावांचा मनावा तसा विकास झालेला नाही अशी ओरड सध्या दबक्या आवाजात मतदारसंघात ऐकाला मिळत आहे. लातूर जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री ना. अमित देशमुख हे पुर्नरचना झाल्यापासून मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. परंतु सात ते आठ वर्षी पासून त्यांच्या या मतदारसंघातील आर्वी, साई, नांदगाव, बसवंतपूर, वरवंटी, हरंगुळ परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. लातूर शहरापासून काही हाकेच्या अंतरावर असलेल्या या गावांच्या रस्त्यांची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे. या रस्त्यांची अवस्था पाहिल्या नंतर प्रवाशांना एकच प्रश्न पडतो तो म्हणजे ‘रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता’ असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे.
लातूर शहर मतदारसंघातील आर्वी ते साई या गावाला जोडणारा जो मुख्य रस्ता आहे या रस्त्याचे तर तीन तेरा वाजले आहेत. विशेषतः म्हणजे या रस्त्यावर लातूर जिल्हा कारागृह आहे. गेली पाच ते सहा वर्षी पासुन या रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे. या रस्त्याने प्रवास करणे अत्यंत जिकरीचे झाले आहे. प्रवाशांना जीव मुठीत धरून या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या या दुरावस्थेमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
साई रोड या मार्गावर असलेल्या नांदगाव गावाला जोडणारा नांदगाव पाटी ते नांदगाव रस्त्याचे तर तीनतेरा वाजले असुन या रस्त्याने दुचाकी घेऊन प्रवास करणे तर सोडाच पण या रस्त्याने चालणे देखील अतिशय कठीण झाले आहे. या रस्ता दुरुस्ती च्या मागणी साठी ग्रामस्थांना अक्षरक्षः आंदोलन करावे लागले. या आंदोलनाची दखल घेत संबंधित जिल्हा परिषद प्रशासन व स्थानिक आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित देशमुख यांच्या शिष्टमंडळाने या रस्त्याची पाहणी केली व दोन दिवसात रस्ता दुरुस्ती च्या कामाला सुरुवात करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले परंतु त्यांचे दोन दिवस पुर्ण झालेच का नाही हेच कळायला मार्ग नाही. मग रस्तादुरुस्ती चा मार्ग मोकळा करण्यासाठी नांदगावकरांना पुन्हा हातात बेशरम घेऊन रस्त्यावर उतरावे लागणार का
त्याचबरोबर लातूर शहर मतदारसंघातील बसवंतपूर (भांबरी), वरवंटी या परिसरातील रस्त्यांची अवस्था जर पाहिली तर शब्दात विश्लेषण पण करता येणार नाही इतकी वाईट अवस्था झालेली आहे. बसवंतपूर पासून ते नांदगाव गावाला जोडणार्या मुख्य रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था निर्माण झालेली आहे. बसवंतपूर ते नांदगाव रस्त्यावर लातूर शहर महानगर पालिकेचा वरवंटी परिसरात कचरा डेपो आहे. लातूर शहरातील कचरा गोळा करणाऱ्या ट्रक्टर, चारचाकी गाड्या याच मुख्य रस्त्याने प्रवास करत असतात. विशेष म्हणजे या मुख्य रस्त्यावर मोठ्या संख्येने वेअर हाऊस (धान्य गोदाम) आहेत. तसेच या भागात लातूर चे रेल्वे स्टेशन आहे या स्टेशन मध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे ने मालवाहतूक होत असते. आणि आलेला माल हा मोठ्या अवजड वाहनांच्या माध्यमातून वेअर हाऊस ला पाठवला जातो. सतत या परिसरात अवजड वाहनांची वाहतूक कायम चालू असते. या रस्त्याने प्रवास करणे अतिशय कठीण झाले असून रस्त्याने सतत प्रवास करून अनेक नागरिकांना, प्रवाशांना दुर्धर आजारांचा सामना करावा लागत आहे. या भागातील प्रवासी, नागरिक, विविध पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा परिषद प्रशासन, स्थानिक आमदार यांच्या कडे वेळोवेळी रस्ता दुरुस्ती ची मागणी केली परंतु याकडे सर्वच लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केली आहे.
पालकमंत्री ना. अमित देशमुख यांच्या लातूर शहर मतदार संघातील रस्त्यांची अवस्था पाहिल्यानंतर जिल्ह्यातील इतर ग्रामीण भागातील रस्त्यांची काय अवस्था असेल अशी शंका प्रवाशांच्या मनात घर करु लागली आहे. निश्चितच पालकमंत्री ना. अमित देशमुख यांच्या लातूर शहर मतदारसंघातील रस्त्यांची अवस्था पाहिल्यानंतर दयनीय रस्त्यांनी लातूर पॅटर्न निर्माण केला आहे ?