आकाशाला स्पर्श करण्याची व वादळाला कवेत घेण्याची क्षमता साहित्यात असते – कवी योगीराज माने
दयानंद मध्ये प्रतिभा संगम विद्यार्थी साहित्य संमेलनाचे उद्घाटन संपन्न
लातूर (प्रतिनिधी) : आकाशाला स्पर्श करण्याची व वादळाला कवेत घेण्याची क्षमता साहित्यात असते. विद्यार्थ्यांनी आपल्या साहित्य निर्मितीचा उपयोग समाज व राष्ट्रकार्यासाठी करावा असे आवाहन ज्येष्ठ कवी योगीराज माने यांनी विद्यार्थी साहित्यिकांना केले. राष्ट्रीय कला मंच, दयानंद कला महाविद्यालय व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रतिभा संगम विद्यार्थी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून योगीराज माने हे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड हे होते. अध्यक्षीय समारोप करताना ते म्हणाले की,”साहित्याच्या आनंदामुळे स्थळ, काळ , वेळ व परिसराचा विसर पडतो. त्याचा आनंद समाज माध्यमांमुळे कमी होताना दिसतोय परंतु प्रतिभा संगम साहित्य संमेलनाच्या माध्यमातून निश्चितच विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची अभिरुची निर्माण होईल.”
राष्ट्रीय कला मंच प्रांत प्रमुख डॉ.संदीपान जगदाळे प्रतिभा संगम आयोजनामागची भूमिका विशद करताना म्हणाले की,”युवा साहित्यिकांना व्यासपीठ मिळावे, ऊर्जा मिळावी, प्रसिद्धी मिळावी त्याच्या लेखनाला दिशा मिळावी यासाठी प्रतिभा संगम आयोजित केले जाते असे सांगितले. प्रास्ताविक ऋषिकेश पवार यांनी केले. सूत्रसंचालन मयुरी कुलकर्णी हिने केले तर आभार प्रदर्शन प्रतिभा संगम साहित्य संमेलनाच्या संयोजिका डॉ.सुनिता सांगोले यांनी केले.अभाविप परिचय महानगर मंत्री प्रसाद मुदगले यांनी केले.
या प्रसंगी सुप्रसिद्ध वात्रटिकाकार भारत सातपुते,जेष्ठ कथाकार जी.जी कांबळे, पर्यवेक्षक डॉ.दिलीप नागरगोजे, प्रा.डॉ.अंकुश चव्हाण, डॉ.गोपाल बाहेती, प्रा.दशरथ ननावरे, हास्य कलावंत बालाजी सुळ, नाट्य कलावंत विजय मस्के,अधिसभा सदस्य रवी गळगे हे उपस्थित होते.