मंगेशकर महाविद्यालयात लता दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली
औराद शहाजानी (भगवान जाधव ) : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या दुःखद निधनाने तेरणा तीरावरील व भारतात लतादीदींचे स्वर हरवल्याची भावना शारदोपासक शिक्षण संस्था, मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय व समस्त औरादकर आज व्यक्त करीत आहे.
मंगेशकर परिवाराने औराद सारख्या ग्रामीण भागात शिक्षणासाठी केलेली मोलाची मदत औरादकरांच्या कायम स्मरणात आहे.
औराद शहाजानी येथील महाविद्यालयाला लता मंगेशकर यांच्या वडिलांचे मास्टर दीनानाथ मंगेशकर असे नाव देण्यात आलेले आहे. या महाविद्यालयांच्या इमारतीच्य उदघाटन कार्यक्रमासाठी ४ डिसेंबर १९७६ रोजी लता मंगेशकर औरादला आलेल्या होत्या. महाविद्यालयाच्या उभारणीसाठी औराद येथील शारदोपासक शिक्षण संस्थेस त्यांनी ‘लता मंगेशकर संगीत रजनी’चा कार्यक्रम देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार २८ फेब्रुवारी १९८१ रोजी लतादीदींचा औराद शहाजानी येथे लता मंगेशकर संगीत रजनीचा कार्यक्रम घेतला. लता मंगेशकर यांनी गायलेली ‘मोगरा फूलला’ हे गीत आजही तेरणा तीरावर गुंजतात.लता मंगेशकर यांनी गायलेले मोगरा फुलला हे गीत आजही औरादकरांच्या स्मरणात आहे. औराद शहाजानीतील शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेली मदत ही मोलाची आहे, अशी भावना संस्थाध्यक्ष विश्वनाथराव वलाडे गुरुजी यांनी व्यक्त केली आहे. शारदोपासक शिक्षण संस्थेच्या वतीने आज मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व लता दीदीच्या औरादकरांच्या वतीने आठवणीना उजाळा देण्यात आला.
यावेळी संस्थेचे सचिव रमेश बगदूरे, संचालक शिवाजीराव जाधव, संध्या शर्मा, सतीश हानेगावे, प्राचार्य वसंत पाटील, प्राचार्य अजितसिंग गाहिरवर यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी संस्थेचे संचालक राजेश वलांडे, मडोळय्या मठपती, अनिल डोइजोडे, दगडू गिरबने, उपप्राचार्य प्रदीप पाटील, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.