माणूसकीने ओथंबलेली काव्यानुभूती आपणास उन्नत व रसरशीत भावानुभव देऊन जाते – भारत सातपुते
लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालय, लातूर आणि राष्ट्रीय कला मंच व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘प्रतिभा संगम ‘विद्यार्थी साहित्य संमेलन साहित्यिक कलावंत यांचे मार्गदर्शन आणि नवोदित साहित्यिक यांच्या उत्तम प्रतिसादात संपन्न झाले.
या संमेलनात मराठी कविता, हिंदी कविता, कथा, ललित गद्य, वैचारिक लेखन, ब्लॉग लेखन आणि पथनाट्य अशा सात साहित्य प्रकारांवर नवोदित कलावंतांशी संवाद साधत साहित्यिकांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी या सर्व प्रकारात आपले साहित्य मांडले. निवडक साहित्याचे समारोप समारंभात सादरीकरणही करण्यात आले. यावेळी समारोप आणि पुरस्कार वितरणासाठी ज्येष्ठ साहित्यिक भारत सातपुते आणि ज्येष्ठ दिग्दर्शक, कलावंत अँड. शैलेश गोजमगुंडे हे उपस्थित होते. दिवसभराच्या साहित्य कलांच्या सादरीकरणामध्ये कळस गाठणारा हा समारोपाचा कार्यक्रम समारोप या प्रसंगी बोलताना भारत सातपुते यांनी ” भाषणात फुले शाहू , वागण्यात मात्र कुठेही खाऊ नाही, मिळाल्यास बघून घेऊ ” अशाप्रकारच्या आपल्या वात्रटिकाद्वारे समाजातील विसंगतीवर बोट ठेवले. ” कधी उसवतो बाप, कधी थकतात पाय, पिऊनिया अंधाराला देतो चांदण्याची साय ” , “नाही झुकलो पोटासाठी, झुकलो नाही पाण्यासाठी, तहानेची ही कोरड घेऊन जगतो आहे कवितेसाठी” अशा काव्य ओळींनी रसिक मनाचा ठाव घेतला. सर्व साहित्यिक, श्रोते, अंतर्मुख होऊन ही कविता ऐकत होते. कलावंताने आपली अभिव्यक्ती केली पाहिजे अभिव्यक्ती कोणताही प्रचारकी थाट किंवा कशाची तरी चौकट घालून करण्यापेक्षा मुक्त अभिव्यक्ती केली तर आपल्यातील कलावंताला वाव मिळतो असे प्रतिपादन भारत सातपुते यांनी केले.
अँड.शैलेंश गोजमगुंडे यांनी कल्पकता प्रत्येकात असते, आपल्यातील कलावंताला म्हणजेच कल्पकतेला वाव देऊन अभिव्यक्ती करत जातो तो साहित्यिक होतो. साहित्याने भारावलेल्या वातावरणात मला खूप आनंद झाला अशा प्रकारचे उपक्रम आज विद्यार्थ्यांमधील कलावंताला जागे करतात म्हणून कलावंत घडविण्याची साहित्यिक घडविण्याची प्रक्रिया प्रस्तुत प्रतिभा संगम साहित्य संमेलनामुळे झाली. अशाच प्रकारचे उपक्रम नेहमीच घेतले जावेत अशा अपेक्षा व्यक्त केल्या.
याप्रसंगी ज्येष्ठ कथाकार जी.जी. कांबळे यांनी कथालेखन संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. सुनीता सांगोले यांनी ब्लॉग लेखन आज अभिव्यक्तीस व्यापक परिमाण देणारे माध्यम आहे, या माध्यमातून लेखन कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ.शैलजा दामरे (हासबे) यांनी वैचारिक लेखनात मुद्देसूद मांडणी, सुसूत्रता यांचे महत्त्व प्रतिपादन करत वैचारिक लेखनाचे मार्गदर्शन केले. १०६ नवोदित साहित्यिकांनी वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारात आपले सादरीकरण केले. यात प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७२५ व्या संजीवन समाधीचे औचित्य साधून पंचविसावे प्रांतस्तरीय प्रतिभा संगम विदयार्थी साहित्य संमेलन हे आळंदी येथे होणार आहे.यात सहभागी होण्यास पात्र विद्यार्थ्यांच्या निवडीचे घोषणाही या समारोप प्रसंगी करण्यात आली. समारोप प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, राष्ट्रीय प्रांत सहप्रमुख डॉ. संदीप जगदाळे, अभाविप महानगराध्यक्ष डॉ.शिवप्रसाद डोंगरे, अभाविप मंत्री प्रसाद मुदगले, बालाजी सुळ हे उपस्थित होते. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैष्णवी कुलकर्णी हिने केले तर आभार अभाविप महानगराध्यक्ष प्रदर्शन डॉ शिवप्रसाद डोंगरे यांनी केले. साहित्यिक, मार्गदर्शक स्पर्धक, विद्यार्थी, रसिक श्रोते साहित्याचे जाणकार यांच्या उत्तम प्रतिसादात साहित्य संगम साहित्य संमेलनाचे सूप वाजले.