शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीवर भाजपाचा पुन्हा झेंडा फडकला
लातूर (प्रतिनिधी) : जिल्हयातील शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीवर भाजपाचा पुन्हा एकदा झेंडा फडकला असून चाकूर नगर पंचायतीत बहुमत नसतानाही राजकीय तडजोड करून अपक्षाच्या मदतीने भाजपाने नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीत बाजी मारून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नगरपंचायतीच्या सत्तेपासून रोखण्यात यश आले असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी बोलून दाखविले. गेल्या महिन्यात जिल्हयातील चार नगरपंचायतीसाठी निवडणूक झाली. निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांतून नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदासाठी निवड कार्यक्रम आज बुधवारी झाला. यात शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीत १७ पैकी ९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविल्याने नगराध्यक्ष पदी मायावती धुमाळ यांची तर उपनगराध्यक्ष पदी सुषमा बस्वराज मठपती यांची निवड करण्यात झाल्याने शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीवर पुन्हा एकदा भाजपाचा झेंडा फडकला आहे.
चाकूर नगरपंचायतीच्या झालेल्या अटीतटीच्या निवडणूकीत १७ पैकी माकणे यांच्या अपक्ष पॅनलने ६ जागा जिंकल्या होत्या तर राष्ट्रवादी काँग्रेस ५, भाजपा ३ आणि काँग्रेसला ३ जागेवर विजय प्राप्त झाला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांना मिळून ८ जागा तर भाजपाला ३ जागा मिळाल्याने भाजपाचे बहुमत नसतानाही स्थानिक पातळीवरील राजकीय समिकरणे जुळवून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नगरपंचायतीच्या सत्तेपासून दुर ठेवण्यात भाजपाला यश आले आहे असे सांगून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, चाकूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदी अपक्ष नगरसेवक कपिल माकणे तर उपनगराध्यक्षपदी भाजपाचे अरविंद बिराजदार यांची निवड झाली आहे.
जिल्हयाचे माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, खा. सुधाकर शृंगारे, आ. अभिमन्यु पवार, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पाटील, प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अशोककाका केंद्रे या सर्वांच्या सहकार्याने आणि प्रयत्नाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला चाकूर नगरपंचायती पासून रोखण्यात भाजपाला यश आले आहे चाकूर आणि शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांचे अभिनंदन करून या निवडणूकीसाठी मेहनत घेतलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचेही भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी अभिनंदन केले आहे.