तिघांनी मिळून एकाला डोक्यात लोखंडी हत्याराने मारून केली मारहाण
पिंपरी (प्रकाश इगवे) : लाकडे कापण्याच्या मशीनचा धाक दाखवून तिघांनी मिळून एकाला मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री भूमकर वस्ती, वाकड येथे घडली. प्रदीप यशवंत भुसारी (वय २९, रा. बाणेर, पुणे) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार युवराज कुदळे (वय २४, रा. भूमकर वस्ती, हिंजवडी), रविराज कुदळे (वय २४, रा. भूमकर वस्ती, हिंजवडी), चेतन रतन येवले (वय २१, रा. पाचाणे, चांदखेड, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या मित्रांसोबत लोणावळा येथे गेले होते. त्यावेळी त्यांचे मित्र गौरव केमसे यांच्या मोबाईल फोनवर आरोपी रविराज याने फोन केला. ही गाडी कोणाची आहे, असे त्याने विचारले. ती गाडी सूरज भूमकर याची असल्याचे आरोपीला सांगितले असता त्याने भूमकर वस्ती येथे येण्यास सांगितले. फिर्यादी व त्यांचे मित्र भूमकर वस्ती येथे गेले. मला शिव्या का देत होता?’ अशी गौरव केमसे यांनी आरोपींना विचारणा केली. त्याचा राग आल्याने रविराज याने लाकडे कापण्याची मशीन सुरू केली तर त्या मशीनचा धाक दाखवून युवराज कुदळे याने फिर्यादी यांच्या डोक्यात लोखंडी हत्याराने मारून गंभीर दुखापत केली. तसेच आरोपी चेतन येवले याने हाताने मारहाण करून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपी रविराज कुदळे आणि चेतन येवले या दोघांना अटक केली आहे.
