पोलिसात तक्रार देणाऱ्यावर खुनी हल्ला
पुणे (प्रशांत इंगवे) : खुनाच्या प्रयत्नाची तक्रार दिल्याच्या रागातून तिघांनी मिळून एका तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी अभिषेक मोरे (वय ३०, रा. बोपोडी) याने दिलेल्या तक्रारीवरून रोहित गद्रे आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल झाला. हा प्रकार सोमवारी (ता. १४) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बोपोडी परिसरातील शिवाजी गार्डनजवळ घडला. तक्रारदार आणि आरोपी रोहित हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. तक्रारदार १४ फेब्रुवारीला शिवाजी गार्डनजवळ थांबला असता, आरोपी त्याच्या दोन साथीदारांसह तेथे आला. ‘माझ्याकडे काय बघतो. तुझ्यामुळे मी तीन महिने जेलमध्ये होतो. तुला मस्ती आली आहे ना, आज तुझी विकेटच टाकतो’, असे म्हणून आरोपीने त्याच्याकडील कोयत्याने तक्रारदाराच्या डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तक्रारदाराने हात मध्ये घातल्याने हातावर वार झाला. तसेच, आरोपीच्या दोन साथीदारांनी तक्रारदाराला हाताने मारहाण केली.