तळवडेतील दुकानातून तीन लाखांचा ऐवज लंपास
पुणे (रफिक शेख) : मोबाईल शॉपीचे शटर उचकटून आत शिरलेल्या चोरट्यांनी मोबाईलसह ३ लाख १४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना तळवडे, रुपीनगर येथे घडली. याप्रकरणी हनुमंत कल्याण ढेरे (वय ३२, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रुपीनगर येथे फिर्यादी यांची मोबाईल शॉपी आहे. सोमवारी रात्री साडेदहा वाजता ढेरे यांनी दुकानाला कुलूप लावून बंद केले. रात्री चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आतील वेगवेगळ्या कंपनीचे व किमतीचे मोबाईल, दोन टॅब, १० स्मार्ट वॉच, २५ एअरबड्स, ७९ स्मार्ट वॉच एअर बड्स, वायरलेस ब्ल्युटुथ संच, पाच ब्ल्युटुथ, दोन कॅमेरे, २० पॉवर बँक असा ३ लाख १४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.