ऑनलाइन फसवणुकीतील 97,698/- रुपये मिळाले परत

ऑनलाइन फसवणुकीतील 97,698/- रुपये मिळाले परत

वरिष्ठांचे मार्गदर्शनात अहमदपुर पोलीसांची कामगिरी…

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील एका व्यक्तील काही दिवसापुर्वी मी बँकेमधून बोलतोय, असे सांगून फसवणूक करून रक्कम उकळण्याचा प्रयत्न अहमदपूर पोलिसांनी हाणून पाडला असून संबंधित तक्रारदारांना त्यांची 97,698/-रुपयाची रक्कम परत मिळवून दिली आहे. याविषयी सविस्तर माहीती अशी की, पोलीस ठाणे अहमदपूर हद्दीत राहणाऱ्या एका इसमास अज्ञात क्रमांकावरून संपर्क साधत आपण बॅँकेतून बोलत असून तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट वाढवायची असल्याचे सांगत क्रेडिट कार्डची माहिती काढून घेतली. त्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर मागून घेत काही वेळातच त्यांच्या क्रेडिट कार्ड लिमिटमधील 97,698/- रुपये वळते झाल्याचा मेसेज तक्रारदार यांना आला. या मेसेसमध्ये एका वॉलेट कंपनीचा उल्लेख होता.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नमूद फिर्यादी अहमदपूर पोलीस स्टेशनच्या पोलिसांशी संपर्क साधत तक्रार दाखल केली.पोलिसांनीही दखल घेत पोलीस ठाणे अहमदपूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 56/2022 कलम 420 भादवि, 66(क) माहिती तंत्रज्ञान अधिनियम सुधारणा-2008 अन्वये गुन्हा दाखल करून लागलीच वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदर गुन्ह्याचा तपास सुरू करून फिर्यादी कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे व अज्ञात व्यक्तीने फसवणूक करून काढून घेतलेल्या रकमेच्या व्यवहाराचे तांत्रिक विश्लेषण करून सदरची रक्कम ज्या गेटवे व वॉलेटच्या माध्यमातून गेली होती त्या गेटवे व वॉलेटला ई-मेल/फोनद्वारे संपर्क साधून, फिर्यादीची फसवणूक करून त्याचे खात्यातील रक्कम काढून घेण्याच्या आत थांबविण्यात आली.वॉलेटमध्ये गेलेली रक्कम परत मिळवून देण्यात आली. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे,अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी (अहमदपूर) बलराज लंजीले यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, पोलीस अमलदार कैलास चौधरी यांनी केली आहे.

About The Author