एशिया वर्ल्ड रेकॉर्डसाठी सृष्टी जगतापचे २४ तास लावणी नृत्य
लातूर (प्रतिनिधी) : लातूरच्या पोतदार स्कुल मध्ये नवव्या वर्गात शिकणारी सृष्टी जगताप आज एशिया वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसाठी सलग २४ तास लावणी नृत्य सादर करणार आहे. आज (ता .२६) दुपारी दोन वाजता ती आपल्या लावणी नृत्याला सुरुवात करणार आहे, लातूरच्या दयानंद सभागृहात या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सृष्टी जगताप हिने याअगोदरही अनेकदा सलग १२ तासा पेक्षा जास्त काळ नृत्य सादर केलेले आहे. यावेळेला २४ तास सलग नृत्य करून एशिया वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रम नोंदविण्याचा तिचा प्रयत्न आहे.
देशात आणि देशा बाहेर तिने आता पर्यंत वेगवेगळ्या नृत्य प्रकारातल्या स्पर्धात सहभाग नोंदवलेला आहे. सलग २४ तास नृत्य करताना दर एका तासाला तीन मिनिटे तिला थांबता येणार आहे. याशिवाय डॉक्टरांची टिम तिला दर दोन तासांनी तपासणार आहे. या रेकॉर्डसाठी एशिया बुक रेकॉर्डचे निरीक्षक उपस्थित राहणार आहेत. तिच्या नृत्याचं २४ तास सलग व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे. सोशल मीडियावरही तिचं नृत्य सलग पाहता येणार आहे. सलग नृत्य सादर करण्यासाठी तिने गेल्या वर्षभरापासून तयारी केलेली आहे . नृत्याच्या सर्व प्रकारात निपुण असलेल्या सृष्टीने जगतापने योगामध्ये सुद्धा यश संपादन केलेले आहे. लहानपणापासूनच नृत्याची आवड असणारी सृष्टी वर्ल्ड रेकॉर्डकडे वाटचाल करीत आहे. तिचे वडील सुधीर जगताप आणि आई संजीवनी जगताप हे दोघेही जिल्हा परिषदेच्या कारला (ता. औसा) येथील शाळॆत शिक्षक आहेत. त्यांना दोन मुली आहेत. वयाच्या अडीच वर्षांपासून नृत्य स्पर्धात यश संपादन करणारी सृष्टी जगताप, आज वर्ल्ड रेकॉर्ड साठी नृत्य सादर करणार असल्याने तिला प्रोत्साहन आणि आशीर्वाद देण्यासाठी लातूरकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन तिच्या आई-वडिलांनी केले आहे .