जैविक हल्ले रोखणारे संशोधन विकसित करा – डॉ. पाटील

जैविक हल्ले रोखणारे संशोधन विकसित करा - डॉ. पाटील

 लातूर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमीकाव्याच्या माध्यमातून सर्व लढाया जिंकल्या. साडेतीनशे वर्षांनंतर आज लढायांच्या पध्दती बदलल्या आहेत. तंत्रज्ञान हॅक करून व्यवस्था डळमळीत करणे, शत्रूराष्ट्रांमध्ये जैविक संसर्ग पसरविणे असे स्वरूप झाले आहे. संगणकशास्त्रातील तंत्रज्ञानच्या विद्यार्थ्यांनी अशा हॅकर्स, जैविक संसर्गाला पायबंद घालणारे संशोधन विकसित करावे, असे प्रतिपादन रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉ. एम. आर. पाटील यांनी केले.

येथील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात (कॉक्सिट) राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित अभिवादन कार्यक्रमात डॉ. पाटील बोलत होते. यावेळी कॉक्सिटचे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. भोसले, उपप्राचार्य डी. आर. सोमवंशी, डॉ. बी. एल. गायकवाड, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. कैलास जाधव, विभाग प्रमुख डॉ. डी. एच. महामुनी, प्रा. ईश्‍वर पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश पवार, प्रा. तानाजी खरबड, कार्यालय अधीक्षक संतोष कांबळे उपस्थित होते.

डॉ. एम. आर. पाटील म्हणाले, कोणतीही साधने उपलब्ध नसताना छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन समोरील लाखोंच्या सैन्याला नामोहरम करण्याचे पराक्रम करीत गनिमीकाव्याने रयतेच्या राज्याची निर्मिती केली. साडेतीनशे वर्षानंतर आज लढाईच्या पध्दती बदलल्या आहेत. आज काल तलवारीने लढाई होत नाही. सध्या सुरू असलेल्या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून सायबर हल्ले हॅकर्सकडून होत आहेत. त्याचप्रमाणे विषारी जैविके निर्माण करून ते सोडून त्याद्वारे समोरच्या देशाला खिळखिळे बनविण्याचे काम होत असल्याचे दिसून येत आहे. हे सायबर हल्ले व जैविक संसर्गाच्या हल्ल्यांना रोखण्यासाठी जैव तंत्रज्ञानसह संगणकशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करून संशोधन विकसित करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

About The Author