राष्ट्रवादी काँग्रेसचा; काँग्रेसला दणका ! अनेक मान्यवरांचा राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचा; काँग्रेसला दणका ! अनेक मान्यवरांचा राष्ट्रवादीत प्रवेश

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीरी नगरपरिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उदगीर शहरातील काँग्रेससह इतरही अनेक पक्षाच्या आजी- माजी नगरसेवकासह युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. राज्यमंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, उदगीर पंचायत समितीचे सभापती शिवाजीराव मुळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंदन बसवराज पाटील नागराळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष तथा माजी तालुकाध्यक्ष प्रा. रामकिशनजी सोनकांबळे, मादलापुर चे सरपंच उदयसिंह मुंडकर, युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष तथा माजी नगरसेवक विजयकुमार चवळे, भीमशक्तीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष शिवकुमार कांबळे, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शिवानंद तोडकर, बबलू शेल्हाळकर, अमोल बसवराज बिरादार, भीमशक्ती चे तालुकाध्यक्ष अरविंद कांबळे, ओबीसीचे शहराध्यक्ष अनिल कुसळे, भीमशक्ती युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रदीप तावरे, भीमशक्तीचे युवा शहराध्यक्ष संघर्ष कांबळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष कृष्णा पवार, अलीम शेख, अमित कांबळे, शिवा देशमुख, लोणी ग्रामपंचायतीचे सदस्य शेख एकबाल, उदगीर शिवसेना उपाध्यक्ष अमोल भवाळ, भीमशक्तीचे देवनी तालुकाध्यक्ष शिवाजी कांबळे, विकास गायकवाड, दीपक भोसले, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केला आहे.

यापूर्वीच काँग्रेसचे अल्पसंख्यांक सेल विभागाचे तालुकाध्यक्ष सय्यद जानी मिंयाॅ मो. हनीफ तसेच काँग्रेस सेवादलाचे जिल्हा सचिव पाशा मिर्झा बेग, एम आय एम चे माजी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक सय्यद ताहेर हुसेन, जर्गर शमसुद्दिन, शेख फैय्याज, शेख नूरजहाँ बेगम, हाश्मी रेश्मा, यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेले जळकोटचे नगरसेवक तात्या पाटील, संदीप डांगे, गोविंद भ्रमण्णा यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद निश्चितच वाढली आहे.
काँग्रेस पक्षातील इतरही काही मान्यवर पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला असल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाची मोठी गोची होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय गणिते मांडली जात असून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या या इन्कमिंग मुळे कोणत्या प्रभागातून कोणाला उमेदवारी मिळेल? हाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नव्याने आलेल्या लोकांना संधी दिली जाईल की? निष्ठावंतांना प्राधान्य दिले जाईल? यासंदर्भात चर्चा सुरू झाल्या आहेत. तर काँग्रेस पक्षाच्या वतीने समविचारी इतर पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी चालू असल्याची चर्चा आहे. यामध्ये प्राधान्याने राष्ट्रीय दलित अधिकार मंच आणि काँग्रेस पक्ष एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. यावेळेस नगरसेवका मधून नगराध्यक्ष निवडला

जाणार असल्याने नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर होणारा घोडेबाजार विचारात घेऊन अनेकांनी आपापल्या प्रभागात प्रचाराला सुरुवात केली असून काहीजणांनी तर सर्वच पक्षांशी संधान बांधून ठेवले आहे. काही जणांनी स्वबळाची तयारी ठेवली आहे. एकंदरीत नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने अद्याप बिगुल वाजले नसले तरी कार्यकर्त्यांनी मात्र गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी सुरू केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी होईल की नाही? यासंदर्भात अद्याप कोणत्याही पक्षाकडून स्पष्ट सूतोवाच्य झालेले नाही.
दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाने देखील या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहराध्यक्ष पदाची धुरा ऐनवेळी मनोज पुदाले यांच्यावर सोपवली आहे. असे असले तरीही भारतीय जनता पक्षाने उदयसिंह ठाकूर यांना बाजूला केल्यामुळे गटबाजी बनवणार असल्याची चर्चा सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत आपल्यालाही निवडणुकीमध्ये संधी मिळेल. असा विचार करून शिवसेनेचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत, मात्र जर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असतील तर शिवसेनेचे काय? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. एकंदरीत येणारा काळ उदगीरच्या नगरपरिषदेचे भवितव्य ठरवणार असला तरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासाठीही या निवडणुका एक मोठे आव्हान ठरणार आहेत. त्या दृष्टीने कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

About The Author