लातूरला शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – पालकमंत्री ना.अमित देशमुख
एन.एस.यु.आय शाखेकडून सुरू करण्यात आलेल्या मोफत आभ्यासिकेचा पालकमंत्री ना.अमित देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ
लातूर (प्रतिनिधी) : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लातूर शहरातील खाडगाव रोड भागातल्या दयानंद गेट परिसरात मोफत अभ्यासिकेची सुरुवात करण्यात आली आहे.सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत व्ही. डी.अभ्यासिका एन.एस.यु.आय. शहर शाखेच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे. या मोफत अभ्यासिकेचा शुभारंभ सोमवार दि.२५ जानेवारी रोजी सायंकाळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना ना.अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लातूरची गरज ओळखून या परिसरात गरजू विद्यार्थ्यासाठी एन.एस. यु.आय.ने सुरू केलेली अभ्यासिका कौतुकास्पद आहे. लातूर शहराचे अर्थकारण हे शिक्षण क्षेत्राशी निगडित आसून लातूरची ओळख ही शिक्षणामुळे होऊ घातलेली आहे. लातुरात आज जे शिक्षणाचे जाळे उभा राहिले त्याचे सर्व श्रेय आदरणीय विलासराव देशमुख यांना जाते आणि म्हणून आज मुंबई, पुणे यानंतर लातूर ची एक वेगळी ओळख निर्माण झाली. आता या पुढील काळात वैद्यकीय शिक्षणाचे जाळे लातूर मध्ये उभे राहावे असा आपला संकल्प असून यासाठी लातूर वासियांचे आशीर्वाद यापुढे राहावेत असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ना.अमित विलासराव देशमुख म्हणाले की, आजवर शिक्षण क्षेत्रासाठी जे वातावरण लातुरात उभे राहिले तसे भविष्यात वैद्यकीय शिक्षणाच्या देखील वातावरण निर्माण करणे हा उद्देश आसून याची सुरुवात लातुरात झाली आहे. लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकिय महाविद्यालय व्हावे अशी मागणी होत असून नुकतेच उस्मानाबाद जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले. यापुढे सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, परभणी या जिल्ह्यात देखील वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी देण्यात येत आहे. या माध्यमातून जागतिक दर्जाशी सुसंगत अशी सुसज्ज आरोग्य यंत्रणा असावी यासाठी पावले टाकण्यास सुरुवात करण्यात आली आहे. येत्या काळात लातूर जिल्ह्यासह मराठवाडा व महाराष्ट्रासाठी बरीच कामे करायची आहेत. ७०/३० च्या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षणात समतोल निर्माण करण्याचा प्रयत्न असून या निर्णयाच्या विरोधात अनेकजण न्यायालयात गेले मात्र अशा याचिका न्यायालयांनी फेटाळत शासनाची भूमिका उचलून धरली आहे. याचा फायदा आज वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होतोय. या पुढील काळात राजस्थान मधील कोटा प्रमाणे महाराष्ट्रात लातूर शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित केले जाईल असे ना.अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी सांगितले. एन एस यु आय अभ्यासिकेचे साठी एक लाख रुपयांची पुस्तके देण्याची घोषणाही पालकमंत्री यांनी यावेळी केली.
दरम्यान या अभ्यासिकेसाठी पुस्तके खरेदी करण्यासाठी दीपक सूळ यांच्याकडून ४२ हजार रुपयांचा धनादेश शरद देशमुख यांना सुपूर्द करण्यात आला. तसेच शिक्षण क्षेत्रातील गुणवंताचा देखील गौरव प्रमाणपत्र देऊन सन्मान यावेळी ना.अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना मनपा महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी एन.एस.यु.आय.कडून सुरू करण्यात आलेल्या व्ही. डी.अभ्यासिकेला शुभेच्छा देत या अभ्यासिकेसाठी २१ हजार रुपयांची पुस्तके भेट देण्याचा शब्द दिला. डॉ सतीश यादव यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक शरद सोळुंके भुमिका मनोगत एन एस यु आय चे जिल्हाध्यक्ष शरद देशमुख यांनी केले. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, शहर जिल्हाध्यक्ष ऍड.किरण जाधव, दीपक सूळ, लक्ष्मण कांबळे, प्रा डाँ संग्राम मोरे संतोष कदम, अय्युब मणियार, दत्ता सोमवंशी, सूर्यकांत कातले, ऍड.शरद जाधव, नागसेन कामेगावकर, रत्नदीप अजनिकर, ऍड.फारुख शेख, मोहन सुरवसे, सुंदर पाटील कव्हेकर, सचिन गंगावणे, प्रवीण पाटील, सुपर्ण जगताप, प्रा.डॉ.सतीश यादव, युनूस मोमीन, महेश काळे,प्रदीप सिंह गंगने, प्रवीण कांबळे, आनंद भाई वैरागे, प्रवीण सुर्यवंशी, रोहित पाटील, परमेश्वर घुटे, सुरज पाटील, विजय टिकेकर यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक, पक्ष पदाधिकारी, सदस्य, महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.