ग्रामदैवत सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानचा यात्रा महोत्सव तीन दिवस चालणार

ग्रामदैवत सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानचा यात्रा महोत्सव तीन दिवस चालणार

विविध धार्मिक उपक्रमाचे आयोजन

लातूर (प्रतिनिधी) :लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवास सोमवार दि.२८ फेब्रुवारी रोजी प्रारंभ होणार आहे. यंदा हा उत्सव तीन दिवसांचा राहणार असून पारंपरिक धार्मिक उत्सव या कालावधीत संपन्न होणार आहेत.

सोमवार दि.२८ फेब्रुवारी रोजी रात्री गवळी समाजाच्या दुग्धाभिषेकाने महोत्सवास प्रारंभ होणार आहे. मंगळवार दि.१ मार्च रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांच्या हस्ते श्रींची महापूजा होणार असून ध्वजारोहण केले जाणार आहे. यात्रा महोत्सवानिमित्त प्रथेप्रमाणे केले जाणारे झेंडा व काठीचे पूजन यावर्षीही देवस्थानच्या परिसरातच संपन्न होणार आहे. बुधवार दि.२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता हरिपाठ व भजन होईल. गुरुवारी दि.३ मार्च रोजी रात्री ८ वाजता गुरुनाथ महाराज देगलूरकर यांचे काल्याचे कीर्तन संपन्न होईल. रात्री ११ वाजता काला व महाप्रसाद होऊन यात्रा महोत्सवाची सांगता होईल.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यात्रा महोत्सवात पारंपारिक धार्मिक विधी संपन्न होणार आहेत. दर्शनासाठी भक्तांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे मात्र दर्शनासाठी येताना भक्तांनी कोरोना विषयक नियमांचे पालन करावे.ज्ञमास्कचा वापर करावा, असे आवाहन देवस्थानच्या प्रशासक श्रीमती हिरा शेळके, प्रदीप भोसले, विश्वस्त विक्रम गोजमगुंडे, अशोक भोसले, श्रीनिवास लाहोटी, मन्मथअप्पा लोखंडे, सुरेश गोजमगुंडे, चंद्रकांत परदेशी, विशाल झांबरे यांच्यासह यात्रा समिती प्रमुख व सदस्यांनी केले आहे.

About The Author