तरूणांना रोजगार निर्मितीसाठी बोगी कारखाना आणण्याचे काम पाटील, पवारांनी केले – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : देशातील लोकसंख्येचा विचार करता सर्वाधिक हूशार तरूण भारत देशात आहेत. आणि सुशिक्षीत बेकारांची संख्याही आपल्याच देशात अधिक आहे. ती येथील चुकीच्या पध्दतीमुळे परंतु तब्बल पस्तीस वर्षानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीसीएस शिक्षण पध्दती आणलेली आहे. यामुळे यापुढील कालावधीत देशातील शैक्षणिक चित्र बदलणार आहे. हे वास्तव असले तरी देशातील व शिक्षणाचा पॅटर्न राबविलेल्या लातूर जिल्ह्यातील सुशिक्षीत तरूणांची संख्या लक्षात घेऊन त्यांना जिल्ह्यातच रोजगार मिळावा या भूमिकेतून राज्यातील महाविकास आघाडीने कुठलाही उद्योग आणण्याचे काम गेल्या गेल्या चाळीस वर्षातही केलेले नाही. पंरतु माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात लातूरचे माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर व आ.अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नातून तरूणांना रोजगार निर्मितीसाठी लातूरात रेल्वेबोगी कारखाना आणण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन भाजपा नेते किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते औसा तालुक्यातील हासेगाववाडी येथे शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजित आ.अभिमन्यू पवार यांच्या जाहीर सत्कार समारंभात उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्ह्याचे प्रभारी संतोषअप्पा मुक्ता, भाजपा औसा तालुकाध्यक्ष सूभाष जाधव, स्वागताध्यक्ष तथा शेतकरी संघटनेेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे, गोपीनाथराव मुंडे विचारमंच अध्यक्ष प्रल्हादराव गड्डीमे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे देवणी तालुकाध्यक्ष वैभव म्हैत्रे, अनंतराव दोडके, छावाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहर लंगर, एमएनएस बँकेचे उपाध्यक्ष एस.आर.मोरे, हणमंतराव देवकते, हासेगाववाडीच्या सरपंच केवळबाई सरवदे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, माझे आणि अभिमन्यू पवार यांची गेल्या पंचवीस वर्षापासून मैत्री आहे. प्रचंड आत्मविश्वास, कष्ट करण्याची तयारी हे गुण असणार्या अभिमन्यू पवारांनी संघर्षावर मात करीत औसा विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला. औसा शहरातच नाही लातूर शहरातील कामांनाही निधी उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले. शहरातील शादीखाना यासह अनेक सभागृहाच्या उभारणीत त्यांनी योगदान दिलेले आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी वॉटरग्रिड देवेंद्रजी फडणवीस व बबनराव लोणीकर साहेबांनी आणले होते. त्याचे टेंडर निघूनही ते काम बंद करण्याचे पाप महाआघाडी सरकारने केले. याप्रमाणेच मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची मुदत संपली त्याची मुदत वाढविण्याचे काम आघाडी सरकारने केले नाही. त्यामुळे मराठवाड्याचा अनुशेष 80 हजार कोटीवर गेलेला आहे. मराठवाड्याला न्याय मिळवून देण्यासाठी वैधानिक मंडळाची गरज आहे. असा दावाही माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापूरे व प्रदीप शेंडगे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार दूर्गाप्रसाद मोेटे यांनी केले. यावेळी या कार्यक्रमाला राजकुमार सस्तापूरे, वैभव म्हैत्रे, अनंत दोडके, नंदकुमार कोल्हे, अनिल शेंडगे, नंदकुमार लवटे, दत्तू लवटे, राजेंद्र लवटे, विकास जोगदंड, सुभान लवटे, नागनाथ शेंडगे, निळकंठ पाटील, नामदेव देवकते, अमृता जाधव यांच्यासह हासेगाववाडी गाव व परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
शेतकर्यांच्या हितासाठी शिवरस्त्यांचा पथदर्शी प्रयोग – गणेश हाके
औसा मतदार संघाला अभिमन्यू पवार यांच्या रूपाने एक चांगला आमदार मिळाला असून त्यांनी सव्वादोन वर्षात शिवरस्ते, शेतरस्ते व पाणंदरस्त्यांच्या कामामध्ये पॅटर्न निर्माण केला. एक पॅशन म्हणून जनतेमध्ये मिसळून काम करणारा 288 आमदारातील एकमेव क्रियटिव्ह आमदार आहे. हे काम यापूर्वी कोणाच्याही लक्षात आलेले नाही. परंतु त्यांनी हे काम सुरू केलेले आहे. शेतकर्यांच्या हितासाठी एक मिशन म्हणून पथदर्शी प्रयोग राबविणारा आमदार अभिमन्यू पवार यांची राज्य व तालुक्याच्या इतिहासात नोंद होईल. असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके यांनी केले.
वीज, रस्ता झाला की पाणी आपोआप मिळेल – अभिमन्यू पवार
ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न मार्गी लागावेत या दृष्टिकोणातून शिवरस्ते, शेतरस्ते व पाणंदरस्त्यांचे काम करण्याची मोहिम हाती घेतलेली आहे. या माध्यमातून हजार किलोमिटर पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाल्यासच सत्कार स्वीकारणार असा संकल्प असतानाही केवळ शेतकरी संघटणेच्या आग्रहास्तव या सत्कार समारंभाला उपस्थित राहिलोय. गतवर्षी 640 कि.मी.चे काम पूर्ण झाले. यंदा 833 किमीचे काम पूर्ण करायचे आहे. यापुढील कालावधीतही रस्त्याच्या कामाचे हे मिशन चालूच राहणार असून भविष्यात एकाही रस्त्याचे काम शिल्लक राहणार नाही. असा विश्वास व्यक्त करीत यापुढचे मिशन विजेचे राहणार असून प्रत्येक गावासाठी शंभरचा डी.पी.बसविणार आहे. माझ्या हातून वीज आणि रस्त्याचे काम झाले की पाणी आपोआप मिळेल. असे प्रतिपादन औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सत्कार सोहळ्याप्रंसगी व्यक्त केले.