बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळून तरुणाचे अपहरण
पुणे (प्रकाश इगवे) : बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळून तरुणाचे अपहरण करून त्याला मुकुंदनगर परिसरात नेण्यात आले. तेथे त्याचा ‘फोन पे’चा पासवर्ड विचारून त्यावरून ६७ हजार रुपये एका क्रमांकावर पाठविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गणेश दराडे (रा. पाटोदा) याला अटक केली आहे.
याबाबत रोहित ईश्वर पवार (वय २७, रा. मांडकी, ता. पुरंदर) यांनी तक्रार दिली आहे. दराडे हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात आला होता. पण, त्याने साथीदाराच्या मदतीने हा गुन्हा केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिली. फिर्यादी दे अलिबाग येथील एका बँकेत नोकरीला आहे. १८ फेब्रुवारी रोजी फिर्यादी अलिबाग येथून पुण्यात स्वारगेट बस स्थानक परिसरात रात्री साडेअकराच्या सुमारास आले. त्यावेळी आरोपी हे दुचाकीवरून त्यांच्याजवळ आले. मारहाण करून त्यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसविले. मुकुंदनगर येथे घेऊन गेले व त्याच्या मोबाईलमध्ये असलेल्या पेटीएमचा पीन क्रमांक विचारून घेतला. त्यानुसार पहिल्यांदा पाच हजार रुपये एका क्रमांकावर पाठविले. त्यानंतर ६० हजार आणि शेवटी दोन हजार रुपये वर्ग करून घेतले. त्यानंतर दोघेही दुचाकीवरून पसार झाले. या घटनेनंतर फिर्यादी हे घाबरले होत. त्यामुळे ते तसेच गावी गेले. गावी गेल्यानंतर वडिलांची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे तक्रार देण्यास उशीर झाला. तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ आरोपींची माहिती काढण्यास सुरुवात केली.