घरफोडीचा गुन्हा उघड; दोन आरोपी जेरबंद.२० हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त.
लातूर (एल पी उगीले) येथील गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील लेबर कॉलनी परिसरात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावत दोन आरोपींना जेरबंद केले असून, त्यांच्या ताब्यातून पॅनॉसॉनिक कंपनीचा एलईडी टीव्ही तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २० हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पथक गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना, दि. ७ ऑक्टोबर रोजी गांधी चौक परिसरात मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे टाउन हॉलच्या पाठीमागील पॅरलल रोडवर दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले.ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे अर्जुनसिंग लक्ष्मणसिंग बावरी (वय ३०, रा. संजय नगर, इस्लामपुरा, लातूर), अजयसिंग महेंद्रसिंग बावरी (वय ३२, रा. संजय नगर, इस्लामपुरा, लातूर) अशी आहेत. दोन्ही आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडून पॅनॉसॉनिक कंपनीचा एलईडी टीव्ही (किंमत ९ हजार रुपये), १.०७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल (किंमत ५ हजार १०० रुपये), ३७ ग्रॅम वजनाची चांदीची चैन (किंमत २ हजार २२० रुपये) व ६४ ग्रॅम वजनाचे चांदीचे ब्रेसलेट (किंमत ३ हजार ८४० रुपये) असा एकूण २० हजार १६० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. मुद्देमालाच्या मालकीबाबत सुरुवातीला समाधानकारक माहिती न दिल्याने अधिक चौकशी केली टीव्ही व दागिने हे त्यांनी त्यांचे फरार साथीदार मारोती उर्फ पाप्या, (रा. कोल्हे नगर, लातूर) व त्याचा एक साथीदार यांच्यासोबत लेबर कॉलनी, लातूर येथे केलेल्या घरफोडीतून मिळविल्याची माहिती दिली. त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याच्या अभिलेखाची पडताळणी केली असता सदर घरफोडीबाबत गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. सदर दोन्ही आरोपींना जप्त मुद्देमालासह गु.र.नं. ५८५/२०२५, कलम ३३१(१), ३३१(२), ३०५ बीएनएस अन्वये दाखल गुन्ह्यात गांधी चौक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, फरार साथीदारांचा शोध सुरू आहे.तसेच आरोपी अर्जुनसिंग बावरी हा गांधी चौक पोलीस ठाण्यातील गु.र.नं. ५५४/२०२४ व गु.र.नं. ६०३/२०२४, कलम ३०३(२) भारतीय न्यायसंहिता या दोन गुन्ह्यांतही पाहिजे असल्याचे पोलीस अभिलेख तपासणीत निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई पोलीस वरिष्ठांचे मार्गदर्शनात निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अमलदार दत्ता शिंदे, रसुल पठाण, विनोद चलवाड, राजेश कंचे, प्रशांत स्वामी, आनंद हल्लाळे, गोविंद यलमटे, प्रेमदास राठोड व चंद्रकांत केंद्रे यांनी केली आहे.













Responses (0 )