Police Flash News

३७ उर्दू शाळांमध्ये मौलाना अबुल कलाम आझाद स्कूल, उदगीरची सफिया ठरली अव्वल!जिल्हास्तरावर उदगीरचा डंका, दमदार भाषणाच्या जोरावर पटकावले ४१ हजारांचे पहिले पारितोषिक;

0
12
३७ उर्दू शाळांमध्ये मौलाना अबुल कलाम आझाद स्कूल, उदगीरची सफिया ठरली अव्वल!जिल्हास्तरावर उदगीरचा डंका, दमदार भाषणाच्या जोरावर पटकावले ४१ हजारांचे पहिले पारितोषिक;

उदगीर (एल पी उगीले)

“प्रगतीच्या शर्यतीत त्याचाच जोर चालतो, जो स्वतःचा मार्ग तयार करून गर्दीतून पुढे निघून जातो!” या उक्तीला अक्षरशः सत्यात उतरवत उदगीरच्या मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू स्कूलच्या गुणवंत विद्यार्थिनी सफिया सरफराज परकोटे हिने आपल्या दमदार वक्तृत्वाच्या जोरावर जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेत दैदिप्यमान यश मिळवले आहे.

अहमदपूर येथील फैज-ए-आम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय स्पीच कॉम्पिटिशनमध्ये लातूर जिल्ह्यातील ३७ उर्दू शाळांमधील ३७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या चुरशीच्या स्पर्धेत सफिया परकोटे हिने ‘भारताच्या नेतृत्वात मुस्लिमांचे योगदान’ हा विषय अत्यंत प्रभावीपणे मांडत थेट प्रथम क्रमांकावर झेप घेतली.

सफियाने आत्मविश्वास, जोश आणि अभ्यासपूर्ण मांडणीच्या जोरावर आपल्या भाषणातून भारताच्या जडणघडणीत मुस्लिम समाजाने दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. तिच्या प्रभावी वक्तृत्वाने उपस्थितांची दाद मिळवली, तर परीक्षकांनाही तिच्या भाषणाने प्रभावित केले.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सफियाला ४१ हजार रुपये रोख, सन्मानपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

पाच विषय ठेवण्यात आले होते.कुरआनमधून जीवन जगण्याचा संपूर्ण मार्ग, जीवनात शिक्षणाचे महत्त्व,भारताचे संविधान आणि आपली जबाबदारी,इस्लामी जगाची एकता — काळाची गरज,

भारताच्या नेतृत्वात मुस्लिमांचे योगदान या विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले विचार प्रभावीपणे मांडले.

स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी ४१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २१ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये, चौथ्या क्रमांकासाठी ५ हजार रुपये आणि पाचव्या क्रमांकासाठी ३ हजार रुपये अशी पारितोषिके ठेवण्यात आली होती.

विशेष म्हणजे स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ट्रस्टच्या वतीने १ हजार रुपये रोख, सन्मानपत्र आणि ट्रॉफी देण्यात आली. सहभागी झालेल्या प्रत्येक उर्दू शाळेलाही ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

फैज-ए-आम चॅरिटेबल ट्रस्ट गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेच्या क्षेत्रात कोणताही भेदभाव न करता कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्यात आत्मविश्वास, ज्ञान व सामाजिक जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने अशा स्पर्धांचे आयोजन केले जाते.

स्पर्धेचे निरीक्षक म्हणून छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथील उर्दू विषयातील पीएच.डी.धारक प्राध्यापकांनी जबाबदारी पार पाडली.

उदगीरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!

सफिया परकोटे हिच्या या घवघवीत यशामुळे मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू स्कूलसह संपूर्ण उदगीरच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील तब्बल ३७ शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवणे ही तिच्या मेहनतीची, अभ्यासाची आणि वक्तृत्वकौशल्याची पावती मानली जात आहे.३७ शाळा... ३७ स्पर्धक... आणि उदगीरची सफिया थेट नंबर वन ४१ हजारांचे पारितोषिक मिळवत सफियाने केवळ स्पर्धा जिंकली नाही, तर उदगीरच्या नावाची जिल्हाभरात जोरदार नोंद केली!

सफियाच्या या यशाबद्दल संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts