लातूर (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची जिल्हास्तरीय बैठक पार पडली. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील ग्राहकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, बाजारपेठेतील गैरप्रकार, वस्तूंच्या विक्रीतील अनियमितता तसेच ग्राहकांची होणारी आर्थिक फसवणूक या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान ग्राहकांना वस्तू खरेदी करताना छापील कमाल किरकोळ किमतीपेक्षा अधिक दर आकारणे, खरेदीची पावती न देणे, मुदत संपलेल्या वस्तूंची विक्री, अन्नपदार्थां मधील भेसळ, निकृष्ट दर्जाच्या वस्तूंची विक्री, वजनमापातील तफावत आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती अशा विविध समस्यांकडे समितीच्या सदस्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. ग्राहकांची फसवणूक होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी नियमित तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.
ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, त्यांच्या तक्रारींचे योग्य पद्धतीने निवारण करणे तसेच विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय राखून ग्राहकहिताचे निर्णय घेणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. ग्राहकांच्या तक्रारी केवळ कागदावर न राहता त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही होऊन तक्रारदारांना न्याय मिळणे महत्त्वाचे असल्याचेही चर्चेत नमूद करण्यात आले.
जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या माध्यमातून ग्राहकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांचे निराकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येणार आहेत. ग्राहकांनी आपल्यावर अन्याय किंवा आर्थिक फसवणूक झाल्यास संबंधित पुरावे, खरेदीची पावती व लेखी तक्रारीसह प्रशासनाकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
या बैठकीस अखिल भारतीय ग्राहक पंचायत, लातूरचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य दत्तात्रय गुरुनाथ मिरकले-पाटील आणि समितीचे सदस्य विवेकानंद वसंतराव वाडीकर यांनी ग्राहकांनी मांडलेल्या विविध तक्रारीचे या बैठकीत निराकरण केले, तसेच भविष्यातही ग्राहकांच्या हक्कासाठी हे व्यासपीठ सक्रियपणे काम करेल असे आश्वासन दिले.














Responses (0 )