लातूर (एल पी उगीले) बनावट पोलीस व ईडी अधिकारी बनून ६६ वर्षीय निवृत्त कर्मचाऱ्याला धमकावले; डिजिटल अरेस्टच्या नावाखाली लाखो रुपये उकळले, अशा घटना घडल्या आहेत.डिजिटल अरेस्टच्या नावाखाली नागरिकांना धमकावून आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांविरुद्ध लातूर पोलिसांनी प्रभावी कारवाई केली आहे. तब्बल २८ लाख ५१ हजार ९९९ रुपयांच्या फसवणूक प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने आरोपींना ६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या सायबर गुन्हेगारांना मोठा धक्का बसला आहे.
लातूर येथील ६६ वर्षीय निवृत्त कर्मचारी यांना अज्ञात व्यक्तींनी पोलीस अधिकारी, एटीएस आणि ईडी अधिकारी असल्याचे भासवून संपर्क साधला. फिर्यादी यांचा १२२ कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सहभाग असून दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे खोटे सांगण्यात आले. अटक, कारावास आणि बदनामीची भीती दाखवून त्यांना मानसिक दबावाखाली ठेवण्यात आले. त्यानंतर आरबीआय च्या निर्देशानुसार बँक खात्यातील रक्कम पडताळणीसाठी हस्तांतरित करावी लागेल, असे सांगून इडी च्या बनावट पत्राचा आधार घेण्यात आला. या खोट्या आश्वासनाला व धमकीला बळी पडून फिर्यादी यांनी विविध बँक खात्यांमध्ये एकूण २८ लाख ५१ हजार ९९९ रुपये हस्तांतरित केले. फिर्यादी यांच्याकडून २८ लाख ५१ हजार ९९९ रुपयांची इतकी रक्कम हस्तांतरित करून घेऊन आर्थिक फसवणूक करण्यात आली.
मध्यप्रदेश, दिल्ली आणि हरियाणातील सहा आरोपी जेरबंद.
सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास व आर्थिक व्यवहारांच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन सहा जणांना अटक केली आहे.अमित शिवनारायण दुबे, (वय ४० वर्षे, रा. महावीर कॉलनी, कटनी, मध्यप्रदेश),अनुराग गणेशदत्ता मिश्रा, (वय २७ वर्षे, रा. मंगलनगर, पयारी सिमेंट दुकानाजवळ, कटनी, मध्यप्रदेश),शिवम माधवसिंह ठाकूर, (वय २४ वर्षे, रा. नेनपूर, जिल्हा मंडला, मध्यप्रदेश),अंकित मानसिंग यादव, (वय ३२ वर्षे, रा. नवीन दिल्ली),कुनालसिंग नरेंद्रसिंग रावत, (वय ३० वर्षे, रा. रविदास वस्ती, दिल्ली),शिवकुमार नरेंद्रसिंग, (वय ३० वर्षे, रा. भारत पीजी सेक्टर ४५, गुरुग्राम, हरियाणा)असे असून सायबर पोलीस ठाणे, लातूर येथे गुन्हा क्रमांक ०५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक आरोपींना १ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, न्यायालय क्रमांक ४, लातूर यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. आर्थिक व्यवहारांची साखळी, फसवणुकीची रक्कम कोणत्या खात्यांत वळविण्यात आली, अन्य आरोपींचा सहभाग आणि गुन्ह्यात वापरलेल्या बँक खात्यांची माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली. न्यायालयाने आरोपींना ६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचने व निर्देशांवर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या नेतृत्वातील पथकामधील सपोनि अशोक उजगिरे, पोलीस अमलदार विकास नळेगावकर, गफार मिर्झा , विजय खारटमोल , अविनाश मरलापल्ले, रवि जाधव,सुमित कदम, कोंडिबा दंडीमे, अमर सरवदे यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील हे करीत आहेत.
पोलीस, एटीएस किंवा इडी अधिकारी असल्याचे भासवून व्हिडिओ कॉलवर चौकशी, अटक किंवा डिजिटल अरेस्टची धमकी देणे, बँक खात्यातील पैसे पडताळणीच्या नावाखाली हस्तांतरित करण्यास सांगणे, ही सायबर फसवणुकीची गंभीर पद्धत आहे. नागरिकांनी अशा धमक्यांना घाबरून आर्थिक व्यवहार करू नयेत.
नागरिकांसाठी लातूर पोलिसांचे आवाहन
- कोणत्याही अनोळखी व्यक्तीला ओटीपी, बँक तपशील किंवा वैयक्तिक माहिती देऊ नका.
- डिजिटल अरेस्टच्या नावाखाली पैसे मागणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका.
- बनावट पोलीस, इडी किंवा सरकारी अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या फोनपासून सावध राहा.
- सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा.
- www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा.
लातूर पोलिसांकडून नागरिकांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी सायबर गुन्ह्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू असून, नागरिकांनी सतर्कता बाळगून सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.














Responses (0 )