Police Flash News

पीडितेशी लग्न करूनही गुन्ह्यातून सुटका नाही; लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला १० वर्षांची शिक्षा!

0
17
पीडितेशी लग्न करूनही गुन्ह्यातून सुटका नाही; लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला १० वर्षांची शिक्षा!

लातूर (एल पी उगीले) येथील जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल आला आहे, ज्यामध्ये १४ साक्षीदारांची साक्ष निर्णायक ठरली आहे. या निकालामुळे निश्चितच लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना धडा मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी, पीडितेसोबत विवाह करून गुन्ह्यातून सुटका मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अखेर न्यायालयाने दोषी ठरविले आहे. विपुल सखाराम बनकर (वय ३५ वर्षे, रा. म्हाडा कॉलनी, लातूर) यास विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. सय्यद यांनी दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी १० वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

दिनांक २६ सप्टेंबर २०१५ रोजी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हाडा कॉलनी येथे आरोपीने एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २११/२०१५ अन्वये भारतीय दंड संहिता कलम ३६३, ३६६-अ, ३७६(२)(एन) व पोक्सो अधिनियम २०१२ च्या कलम ६ व ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर. ए. पडवळ यांनी करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. खटल्यादरम्यान एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, सरकारी पंच, वैद्यकीय अधिकारी व तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.विशेष म्हणजे, पीडितेची न्यायालयात साक्ष झाल्यानंतर आरोपीने तिच्यासोबत विवाह केला व त्यानंतर पीडितेची पुन्हा साक्ष नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला. पुढे विवाह व अपत्य जन्माच्या आधारे आरोपीने बचाव करण्याचा प्रयत्न केला. तथापि, पीडिता व आरोपी एकत्र राहत नसून त्यांच्यात वैवाहिक वाद असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. अभियोग पक्षाने आरोपीचा बचाव खोटा असल्याचे प्रभावीपणे मांडले.

सरकारी अभियोक्ता एस. एम. मुंदडा व विशेष सरकारी अभियोक्ता मंगेश महिंद्रकर यांनी न्यायालयात प्रभावी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद व पुराव्यांचे अवलोकन करून न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून १० वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सदर खटल्याच्या यशस्वी कामकाजासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रायल मॉनिटरिंग सेलचे सपोनि एस. व्ही. मनाळे, पोलीस अंमलदार चंद्रकांत राचमाळे, गोविंद बिराजदार, महिला पोलीस अंमलदार पकाले व काळे यांनी परिश्रम घेतले.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts