लातूर (एल पी उगीले) शेताकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या प्रकरणात आरोपीस अतिरिक्त सत्र न्यायालय, निलंगा यांनी ७ वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली आहे. शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्याचा निकाल दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ रोजी जाहीर झाला. सदर प्रकरण हे शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याच्या स्टार केसपैकी एक होते.
साकोळ, ता. शिरूर अनंतपाळ येथील फिर्यादी शिवलिंग सुभाष डोंगरे यांच्या शेतजमिनीच्या रस्त्यावरून त्यांच्या भावकीतील व्यक्तींसोबत वाद सुरू होता. दिनांक १ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास या वादावर तोडगा काढण्यासाठी संबंधित व्यक्तींची शेतात बैठक झाली होती. मात्र, बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यानंतर फिर्यादी शिवलिंग डोंगरे हे मोटारसायकलवरून गावाकडे जात असताना संग्राम डोंगरे यांच्या शेताजवळ आरोपी विशाल डोंगरे याने मोटारसायकलने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. त्यामुळे फिर्यादी खाली पडले असता त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्याचवेळी आरोपी संग्राम डोंगरे याने दगड फेकून मारल्याने फिर्यादी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी आलेले फिर्यादीचे चुलते भगवान विश्वनाथ डोंगरे यांनाही आरोपींकडून मारहाण करण्यात आली. आरोपी संग्राम डोंगरे याने दगड फेकून मारल्याने भगवान डोंगरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालय, साकोळ येथे नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालय, लातूर येथे दाखल करण्यात आले. गंभीर दुखापतीमुळे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान भगवान डोंगरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
याप्रकरणी पोलीस ठाणे शिरूर अनंतपाळ येथे गुरनं. २६/२०२३ अन्वये भारतीय दंड विधान कलम ३०२, ३०७, ३२४, ३२३, ५०४, ५०६ व मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनात तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक मानुल्ला यांनी केला.
तपासाअंती प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले. अतिरिक्त सत्र खटला क्र. ०९/२०२३ मध्ये अतिरिक्त सत्र न्यायालय, निलंगा येथील न्यायाधीश एस. बी. पवार यांनी दिनांक ०३ नोव्हेंबर २०२६ रोजी निकाल देताना आरोपी संग्राम माणिक डोंगरे यास भारतीय दंड विधान कलम ३०४ भाग २ अन्वये सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात ७ वर्षे सश्रम कारावास व ५,००० रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच कलम ३२४ अन्वये ३ वर्षे कारावास व २,००० रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने कारावासाची शिक्षा सुनावली.
आरोपी क्रमांक १ व २ विशाल माणिक डोंगरे, ओमकार संग्राम डोंगरे यांना कलम ३२३ सह ३४ अन्वये प्रत्येकी १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपी क्रमांक १ व २ यांची इतर कलमांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली.
सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मानुल्ला हे होते. तर न्यायालयीन पैरवी अंमलदार ए. जी. कांबळे यांनी प्रभारी अधिकारी अक्षय जाधव, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक, पोलीस ठाणे शिरूर अनंतपाळ यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला.अतिरिक्त सरकारी अभियोक्ता के. व्ही. पंढरीकर यांनी काम पाहिले
सदर प्रकरणात प्रभावी तपास, न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यक पाठपुरावा आणि पैरवी यामुळे न्यायालयीन निकालापर्यंत प्रकरण पोहोचले. लातूर जिल्हा पोलीस दलाच्या दृष्टीने ही स्टार केस असून गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीत शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस दलाकडून करण्यात येणाऱ्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे उदाहरण आहे.













Responses (0 )