प्राचार्य डॉ. वसंत बिरादार ‘लोकसंवाद’ पुरस्काराने सन्मानित
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या ‘लोकसंवाद’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, श्री यशवंतराव ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा ता. उमरी जि. नांदेड च्या वतीने मागील पंधरा वर्षापासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना लोकसंवाद पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन २०२१ या पुरस्काराचे मानकरी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात उच्च शिक्षणात ‘फुले पॅटर्न’ निर्माण करणारे अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षणतज्ज्ञ , मराठीचे थोर साहित्यिक व समीक्षक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांना दि. ३१जानेवारी २०२१ रोजी सिंधी ता. उमरी येथे १५व्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनात संमेलनाचे अध्यक्ष डॉ. भगवान अंजनीकर, नांदेड वाघाळा महानगर पालिकेच्या सेविका स्वागताध्यक्ष सौ. संगीता डक पाटील, उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, संयोजक दिगंबर कदम, गोविंदराव पाटील किवळेकर आदी मान्यवरांच्या हस्ते ‘लोकसंवाद’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
या पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल, महावस्त्र व प्रशस्तीपत्र असे होते.विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना आजपर्यंत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धाराशिव शिराळे यांनी केले यावेळी रवीन्द्र चव्हाण, देशमुख, बन्नाळीकर, कवी सम्मेलनाचे अध्यक्ष सदाफुले यांच्यासह साहित्य रसिक मोठ्या संख्येंने उपस्थित होते.