छत्रपती शिवरायांचे प्रशासन लोक कल्याणकारी होते – डॉ. काशिनाथ चव्हाण
अहमदपूर (गोविंद काळे) : “छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेचे हित साध्य करून पहिल्यांदाच वंशपरंपरा नाकरली. रयतेचा उस्फूर्तपणे राजा म्हणून नावलौकिक मिळविलेल्या या राजाने आपले राज्य जनतेसाठीच अर्पण केले. ते राज्य म्हणजे छत्रपती शिवरायांची शिवशाही. शिवरायांचे संपूर्ण प्रशासन हे खऱ्या अर्थाने लोकशाही, लोककल्याणाचे प्रशासन होते”, असे प्रतिपादन वसमत येथील योगानंद स्वामी महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख तथा इतिहासाचे ज्येष्ठ संशोधक डॉ. काशिनाथ चव्हाण यांनी केले.
डॉ.चव्हाण हे येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्रातर्फे ऑनलाइन आभासी तथा दूर दृश्य ‘झूम’ प्रणालीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या प्रबोधन कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते. यावेळी पुढे बोलताना डॉ. चव्हाण म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास नव्याने लिहिण्याची गरज आहे. ‘तलवारधारी शिवाजी’ ही प्रतिमा जनमानसात मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यात आली. मात्र ‘उत्तम प्रशासक राजा शिवाजी’ ही प्रतिमा जनतेपुढे येण्याची आज गरज आहे. आजच्या राज्यकर्त्यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रशासनाचा आदर्श घेण्याची गरज आहे ” असेही ते यावेळी म्हणाले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, छत्रपती शिवरायांची आपल्या प्रशासनावर कमालीची पकड होती. त्यांना रयतेबद्दल प्रचंड कळवळा होता. म्हणूनच रयतेच्या काडीलाही हात लावू नका असे ‘आज्ञापत्र’ त्यांनी काढले होते. शिवरायांचा राज्यकारभार खऱ्या अर्थाने आदर्श होता असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे प्रमुख, आयोजक तथा इतिहास विभाग प्रमुख डॉ.बब्रुवान मोरे यांनी केले तर प्रा.डॉ. नागराज मुळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील महाविद्यालयातील प्राध्यापक, कै.बापुसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. ओमप्रकाश क्षीरसागर, डॉ. अनंत शिंदे, शिवाजी महाविद्यालय परभणी येथील प्रा. भोपे, यांच्या सह इतर प्राध्यापक,तसेच फुले महाविद्यालयातील कर्मचारी विद्यार्थी तसेच इतिहासाचे अभ्यासक, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.