जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या अभंग जागर कार्यक्रमासउत्स्फुर्त प्रतिसाद
लातूर (प्रतिनिधी) : मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद ,शाखा जिल्हा लातूर तर्फे जगद्गुरू संत शिरोमणी तुकोबाराय यांच्या जयंतीनिमित्त अभंग जागर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास लातूर शहर व जिल्ह्यातील कवींची मोठ्या संख्येने उपस्थिती लक्षणीय असल्यामुळे या कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे वास्तव चित्र दिसून आले.
संत तुकारामांचे अभंग अत्यंत वस्तुनिष्ठ व विज्ञाननिष्ठ असून संत तुकोबारायांचे समाजाप्रती योगदान व त्यांच्या विचारांची प्रासंगिकता नव्या पिढीच्यासमोर आणण्याच्या उद्देशाने अभंग जागर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वृक्षजलार्पन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवी व गीतकार योगीराज माने होते.तर प्रमुख अतिथी म्हणून मराठा सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष लिंबराज सूर्यवंशी, ज्येष्ठ साहित्यिक विनायकराव कदम पाटील,जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्ष रंजना चव्हाण, जिजाऊ ब्रिगेडच्या लातूर जिल्हाध्यक्ष ताई बोराडे,तानुबाई बिर्जे पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव,मराठा सेवा संघाचे लातूर शहराध्यक्ष पृथ्वीराज पवार,समाधान माने, डॉ. अभय कदम आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
अभंग जागर कार्यक्रमाप्रसंगी कवी योगिराज माने यांनी अत्यंत दर्जेदार अभंग सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. शिवाय अभंग जागरात निमंत्रित कवी नरसिंग इंगळे यांनी सादर केलेला कोरोना व आजची परिस्थिती व तुकोबारायांचे अभंग या समन्वय घालणारा अभंग कार्यक्रमाला एका विशिष्ट उंचीवर घेऊन गेला. तसेच कवी गोविंद जाधव, नामदेव कोद्रे , राजेंद्र माळी, वृषाली पाटील, नयन राजमाने, शैलेजा कारंडे, रजनी गिरवलकर, रामचंद्र बैले, सदाफुले, विमल कदम, सुनंदा शिंदे आदी कवींनीही आपल्या अभंग रचनेतून कार्यक्रमास रंगत आणली.
कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले संत साहित्याचे अभ्यासक विनायकराव कदम पाटील यांनी तुकाराम महाराजांचा जीवनपट व आधुनिक काळात त्यांच्या विचारांची नितांत गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिषदेचे अध्यक्ष विवेक सौताडेकर यांनी केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून 24 तास सलग लावणी नृत्य करून एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केल्याबद्दल कु.सृष्टी सुधीर जगताप हिचा परिषदेच्यावतीने सन्मानचिन्ह, शॉल आणि ग्रंथ भेट देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन परिषदेचे संघटक बाळासाहेब यादव व कवयित्री शैलजा कारंडे यांनी केले. तर आभार परिषदेचे सचिव ब्रिजलाल कदम पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. द.मा.माने,संंघटक बाळासाहेब यादव, कार्याध्यक्ष युवराज ढविले, कोषाध्यक्ष प्रा.मेघराज सूर्यवंशी, सहसचिव मनीषाताई गुंजरगे, डॉ.दिनेश भिसे,डॉ.हणमंत पवार आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला मराठा सेवा संघाच्या सर्व कक्षाच्या पदधिकार्यांसह साहित्यप्रेमींची उपस्थिती होती.