पीकविमा कंपनीच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करा – आ. अभिमन्यू पवार
खरीप हंगामाचा सरसकट विमा मंजूर करून वितरित करा
लातुर (प्रतिनिधी) : यावर्षी चांगला पाऊस झाल्याने उडीद, मुग, सोयाबीन, तुर आदी पीके जोमात होती. परंतू करपा व तत्सम रोग पडल्याने आणि काढणीच्या वेळी आलेल्या अतिवृष्टीमुळे पीकांचे, खास करून सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी पंचनाम्यासाठी वैयक्तिक अर्ज सादर केले आहेत तरी पंचनाम्याची अपेक्षित कार्यवाही कंपनीकडून झाली नाही. कंपनीने अनेक शेतकऱ्यांचे आॅफलाईन अर्ज स्वीकारलेच नाहीत. मनमानी कारभार करणारी विमा कंपनी निवडक शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम जमा करून जबाबदारी झटकू पाहत आहे. अनुदानासाठी राज्य सरकारने केलेल्या पंचनाम्यात जिल्ह्यातील जवळपास सर्वच शेतकरी नुकसानभरपाई मिळण्यासाठी पात्र ठरले आहेत मग विमा वितरणासाठी वेगळे निकष का पंचनाम्यासाठी किती वैयक्तिक अर्ज आले, किती पंचनामे झाले आणि किती शेतकऱ्यांना विमा दिला याची चौकशी करावी व शेतकऱ्यांना सरसकट विमा वितरित करण्यात यावा अशी मागणी आ. अभिमन्यू पवार यांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
तुर उत्पादनात ५०% संभाव्य घट येत असल्याचे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी तरतुदीनुसार २५% आगाऊ विमा शेतकऱ्यांना देण्याचे आदेश १५ डिसेंबर २०२० रोजी निर्गमित केले होते. नियमानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ३० दिवसांच्या आत आगाऊ विमा देणे बंधनकारक असताना विमा कंपनीने अद्यापही त्यावर काही कारवाई केलेली नाही. जर पीकविमा संदर्भातील शेतकऱ्यांच्या अडचणी पुढील ८ दिवसांत सुटल्या नाहीत तर मतदारसंघातील शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा आ. अभिमन्यू पवार यांनी दिली आहे.
यावेळी संतोष मुक्ता, गटनेते सुनील उटगे, जि प सदस्य भागवत कांबळे, प समिती सदस्य जनार्दन कास्ते, दीपक चाबुकस्वार, बालाजी शिंदे, नगरसेवक नितीन वाघमारे, रविशंकर केंद्रे, दत्ता चेवले, नामदेव जन्मले, देवा हाळे, विष्णू कोळपे, भरत कोळपे, मोहित पाटील, श्रीराम माने, भीमाशंकर मिटकरी, डाॅ शभुंराजे भोसले, विनोद जाधव, कासार सिरसी मंडळ महिला मोर्चा अध्यक्ष सौ कल्पनाताई ढविले, दीपक ढविले, रविकुमार चिलमे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.