उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेदाचा जीवनात अंगीकार करा – डॉ. बब्रुवान मोरे
अहमदपूर ( गोविंद काळे) : “आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या काळातही उत्तम आरोग्य लाभावे असे वाटत असेल तर, आयुर्वेदाच्या आधारे जीवन जगावे “, असे प्रतिपादन डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले. येथील महात्मा फुले महाविद्यालयात विद्यार्थी प्रबोधन पंधरवड्याच्या निमित्ताने संस्कृत विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या” उत्तम स्वास्थ्यासाठी आयुर्वेद”, या विशेष व्याख्यानात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते यावेळी विचार मंचावर प्रमुख मार्गदर्शक डॉ.बब्रुवान मोरे हे उपस्थित होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, कार्यालय अधिक्षक प्रशांत डोंगळीकर यांची व कार्यक्रमाचे संयोजक डॉ. प्रशांत बिरादार यांची उपस्थिती होती .
यावेळी पुढे बोलताना डॉ. मोरे म्हणाले की, आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी असून, कोरोनाच्या काळात संपूर्ण जगाला भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदाचे महत्त्व समजले. सर्वांनी प्राणायाम, योगा व आयुर्वेदाचा जीवनात अंगिकार करावा.असेही ते म्हणाले.तसेच यावेळी त्यांनी विविध प्रकारच्या आजारांवर घरगुती उपचार आणि आयुर्वेदिक औषधांविषयीही माहिती दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपा प्रसंगी प्राचार्य डॉ वसंत बिरादार पाटील म्हणाले की, आयुर्वेद म्हणजे माणसाला निसर्गाशी एकरूप होण्याचा मूलमंत्र देणारी महान ज्ञानशाखा असून, आयुर्वेदिक तत्त्वप्रणालीचे आयुष्यात उपयोजन करुन प्रत्येकाने सुंदर सहजीवनाचा मनमुराद आनंद घेतला पाहिजे. शंभर वर्ष जगण्यासाठी प्रत्येकाने जेवणातून मीठ साखर मैदा हद्दपार केले पाहिजे व आयुर्वेदात सांगितलेली आहार, विहार आणि विचार पद्धती चा अंगीकार करावा असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संयोजक डॉ. प्रशांत बिरादार यांनी केले तर आभार डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते तर आभासी तथा दूरदृश्य ( झूम ) प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येंने उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम् ने तर सांगता राष्ट्रगीताने झाली.