शिवरायांच्या विचाराने चालणार्‍या महाराष्ट्रात शिवजयंतीसाठी परवानगीची गरज नाही – नानासाहेब जावळे

शिवरायांच्या विचाराने चालणार्‍या महाराष्ट्रात शिवजयंतीसाठी परवानगीची गरज नाही - नानासाहेब जावळे

लातूर (प्रतिनिधी) : देशामध्ये व राज्यामध्ये सर्वांना सोबत घेवून चालणारे शिवरायांचे सरकार होते. त्यांचे आचार-विचार आजही शिवप्रेमींच्या मनामध्ये रूजलेले आहे. आणि त्याच शिवरायांच्या विचाराने चालणार्‍या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करण्याची परवानगी घ्यावी लागते. हे दुदर्र्ैव आहे. परंतु शिवरायांच्या विचाराने चालणार्‍या महाराष्ट्रात शिवजयंतीसाठी परवानगीची गरजच नाही.त्यामुळे यंदाची शिवजयंतीही राज्यात उत्साहाने साजरी होणार असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रिय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी केले. यावेळी ते सकल शिवप्रेमीच्यावतीने सार्वजनिक शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमिवर शासकीय विश्रामगृहावर आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी भाजपा युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, अखिल भारतीय छावा संघटनेचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील, मराठा सेवा संघाचे सुनिल नावाडे, भगवानदादा माकणे, विजय औंढे, अ‍ॅड.विजय गवारे, गणेश गोमचाळे, सिध्दाजी जगपात, मनोज फेसाटे, मराठा महासंघाचे अध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी, हिंदू सेनेचे संस्थापक अध्यक्ष बालाजी सुर्यवंशी, आम्रपाली सुरवसे, खंडेराव गंगणे, संभाजी नवघरे, अमरदिप गुंजोटे, शहाजी पवार, बाळासाहेब जाधव, सोमनाथ सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना नानासाहेब जावळे म्हणाले की, राज्यशासनाने शिवजयंती 10 जणांच्या उपस्थितीत घरीच साजरी करावी, असे आवाहन केल्यामुळे शिवप्रेमीतून नाराजी व्यक्‍त केली जात आहे. त्यामुळे या ठाकरे सरकारचा निषेधही त्यांनी यावेळी व्यक्‍त केला. त्यामुळे खचून न जाता शिवप्रेमींनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी राज्यशासनाच्या कृतीबद्दल प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून व सकल शिवप्रेमींच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन निषेध व्यक्‍त करण्यात आला.

राज्याला मार्गदर्शक होईल अशी शिवजयंती साजरी करू -निलंगेकर
शिवरायांच्या विचाराने चालणार्‍या महाराष्ट्रात शिवजयंतीसाठी परवानगी घ्यावी लागते, हे दुर्दव आहे. कोरोणानंतर सर्वच यंत्रणा शिथील झालेल्या आहेत. नाट्यगृह सिनेमागृह सुरू आहेत. मग शिवजयंतीलाच का विरोध? असा सवाल उपस्थित करीत छत्रपती शिवरायांच्या विचारावर वाटचाल करीत राज्याला मार्गदर्शक होईल, अशी शिवजयंती साजरी करू, असे प्रतिपादन भाजपा युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी केले.

शिवजन्मोत्सव तर होणारच – नावाडे

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म साजरा करण्यासाठी सरकारच्या परवानगीची गरज नाही. आणि आम्ही ती घेतही नाही. लाखो लोकांचे मोर्चे शांततेत काढून जगासमोर आदर्श निर्माण करणार्‍या मावळ्यांना पोलिस बंदोबस्त लागतच नाही. त्यामुळे शुक्रवारी 6 वाजेपर्यंत शासनाने निर्णय नाही घेतला तर शिवजन्मोत्सव तर होणारच, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल नावाडे यांनी केले.

About The Author