सैनिकांच्या बळावरच राष्ट्र सुरक्षित – प्रा.मारोती बुद्रुक
रक्षक ग्रुप च्या वतीने शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली.
अहमदपूर ( गोविंद काळे) : जेव्हा सर्व नागरिक गाढ झोपेत असतात तेव्हा सैनिक डोळ्यात तेल घालून देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावतात त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळेच भारतासारखे राष्ट्र सुरक्षित आहे.आपण सर्व भारतीयांनी शहिदांच्या कुटुंबीयांना आधार देण्याचे आवाहन शिव व्याख्याते प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांनी केले.
रक्षक ग्रुपच्या वतीने पुलवामा येथील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या 40 वीर जवानांना शिवाजी चौक अहमदपूर येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर केदार, आजी माजी सैनिक भानुदास कराड,शिवाजी ईप्पर,हनुमंत मुंडे,सुभाष मुंडे,मारोती मुंडे,विष्णु जायभाये, पत्रकार गोविंद काळे,ज्ञानोबा मद्देवाड, बळीराम मुंडे,गंगाधर अमुगे, ज्योतीराम दराडे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना बुद्रुक पाटील म्हणाले आमच्या भारत मातेचे सुपुत्र जाबाज सैनिक डोळ्यात तेल घालून देशाच्या सीमेवर आपल्या राष्ट्राचे संरक्षण करतात. शत्रू राष्ट्रांतील सैनिकांनी अचानक पणे विश्रांतीच्या स्थळावर भ्याड हल्ला करून पुलवामा येथे चाळीस सैनिकावर बेछूट गोळीबार केला देशाच्या रक्षणासाठी आमचे सैनिक शहीद झाले.सैनिकांच्या कुटुंबाचा आधार गेला. त्यांच्या कुटुंबीयांना आधार देणे हीच खरी त्यांच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली आहे. अत्यंत कठीण आणि अवघड परिस्थितीच्या वेळी सैनिकांची खरी परीक्षा असते.जम्मू-काश्मीर व चीनच्या सीमेजवळ लपून-छपून गोळीबार केला जातो पण त्याचा प्रतिकार करून भारतीय सैनिक जीवाची बाजी करून शहीद होतात. शहीद झालेल्या सैनिकाच्या मुलाबाळांना आधार देऊन त्यांच्या पाठीमागे खंबीर उभी राहण्याची ताकद समाजाने निर्माण करावी.
देशाचा सैनिक हा आपल्या बाजूच्या घरातला असावा असे वाटते.म्हणूनच भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम म्हणतात की, देशासाठी तुमच्याकडे दहा मिनिटे वेळ आहे काय ? नक्कीच आपण सर्वांनी यावर एक वेळा तरी विचार करायला हवे. देशात दोन व्यक्ती आपल्या सर्वासाठी महान आहेत एक म्हणजे किसान आणि दुसरा जवान. किसान आपणास अन्न पुरवठा करतो तर जवान आपली सुरक्षा करतो. म्हणूनच भारताचे दुसरे पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांनी देशाला ‘जय जवान जय किसान’ हा नारा दिला. म्हणून सीमेवर लढणारा जवान आणि शेतात काबाडकष्ट करणारा माझा शेतकरी दोघांचेदेखील सन्मान करणे गरजेचे आहे.एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहे तर दुसरीकडे घुसखोरी करणारे आतंकवादी दररोज आपल्या आपल्या सैनिकांना मारत आहेत. त्यामुळे या दोन्ही महत्त्वाच्या व्यक्तीचे घरसंसार वार्यावर येत आहेत.यासाठी समाजाने सैनिकाच्या सुखात आणि दुःखात सुद्धा सोबत असायला हवे.
सीमेवर लढणाऱ्या जवानांनी रक्षक ग्रुप च्या माध्यमातून प्रत्येकाच्या सुखात आणि दुःखात आपलं कर्तव्य बजावल आहे.जिथे कमी तिथे आम्ही हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून अनेकांचे संसार उभे करण्याचे काम या ग्रुपच्या माध्यमातून होत आहे.हे त्यांचे कार्य निश्चितच भूषणावह आहे असे मत प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांनी केले.