शाळा दुरुस्तीच्या निमित्ताने मागितलेली लाच !! लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आणली त्याच्यावर आंच!!!
लातूर (कैलास साळुंके) : चाकूर तालुक्यातील जढाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील खोलीच्या दुरुस्तीसाठी केलेल्या कामाची एक लाख 22 हजार 180 रुपयांची मंजुरी घेऊन आलेल्या बिलाच्या चेकवर सही करण्याचे कामासाठी ग्रामसेवक श्रीकांत प्रभाकर पतंगे आणि डोंगरज येथील ग्रामसेवक प्रल्हाद नागनाथ कानुरे यांच्या विरोधात तक्रारदाराने लातूर जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन पोलीस उपाधीक्षक एन.जी. अंकुशकर त्यांच्याकडे तक्रार दिली की, बिलाची रक्कम देण्यासाठी आरोपींनी सात हजार रुपये लाच मागितली आहे.लाचलुचपत विभागाने सापळा रचून कार्यवाही केली. लाचेची रक्कम हॉटेल मयूर येथे आरोपी क्रमांक दोन यांच्या मार्फत लाच स्वीकारली. सदर प्रकरणी शिक्षेची कारवाई नांदेड परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारावकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पोलीस उपाधीक्षक मानिक बेद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. याप्रकरणी सरकारी वकील संतोष देशपांडे, कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे,कुमार दराडे, पोलीस हवालदार लक्ष्मीकांत देशमुख यांनी पार पाडली. याप्रकरणी चाकुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 3020 /12 कलम 7, 12, 13 (1) (ड) याच्यासह कलम 13 (2) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील प्रकरण लातूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालय 06 येथे चालले. याप्रकरणी आरोपी क्रमांक एक अर्थात श्रीकांत प्रभाकर पतंगे यास दोषी धरून कलम 7 अन्वये तीन वर्षे शिक्षा व दहा हजार रुपये दंड तसेच कलम 13 अन्वये तीन वर्षे शिक्षा व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. दोन्ही शिक्षा एकदाच भोगायचे आहेत. या प्रकरणातील आरोपी क्रमांक दोन प्रल्हाद नागनाथ कानुरे यास निर्दोष मुक्त करण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धडक कारवाईने लातूर विभागात मोठा वचक लाचखोरावर निर्माण झाला आहे. लातूर विभागातील कोणत्याही नागरिकाला शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणत्याही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग लातूर यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा. असे आव्हान पोलीस उपाधीक्षक माणिक बेद्रे, पोलीस निरीक्षक कुमार दराडे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे यांनी केले आहे.